

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील २८ प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरण व दुरुस्ती कामांना वेग देण्यात आला असताना या कामांसमोर आता डांबराचा तुटवडा निर्माण झाल्याने अडचण उभी राहिली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबर पुरवठ्यावर परिणाम झाल्याचा दावा ठेकेदारांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रभारी शहर अभियंता रवींद्र धारणकर यांनी ठेकेदारांची बैठक घेत रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याची तंबी दिली आहे. नाशिक महापालिकेने शहरात १२३० कोटी रुपये खर्चुन २८ रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. ही कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या रस्त्यांत युटिलिटी डक्ट, जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन, ऑप्टिकल फायबरची कामे सुरू असल्याने कामांचा वेग संथ असल्याचे चित्र आहे. पावसाळा जवळ आल्याने रस्त्यांवरील खड्डे, माती व खोदकाम तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर गुरुवारी प्रभारी शहर अभियंता रवींद्र धारणकर यांनी १८ ठेकेदारांची बैठक घेत कडक सूचना दिल्या.
बैठकीत ठेकेदारांनी डांबर उपलब्ध होत नसल्याची अडचण मांडली. मात्र 'डांबर कुठूनही आणा, दुसऱ्या प्लांटमधून खरेदी करा, पण रस्ते पूर्ववत करा' असे आदेश देत धारणकर यांनी कोणतीही सबब मान्य केली जाणार नाही, असा इशारा दिला. पावसाळ्यापूर्वी क्रॉसिंग बुजवणे, खड्डे दुरुस्त करणे, माती हटवणे आणि आवश्यक ठिकाणी डांबरीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, ठेकेदारांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. मात्र, प्रशासनाने हा युक्तिवाद नाकारत तातडीने काम पूर्ण करण्याचा ठाम आदेश दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे नाशिक महापालिकेच्या रस्ते विकास कामांवर 'डांबर संकट' निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांत परिस्थिती कशी हाताळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ठेकेदारांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. मात्र, प्रशासनाने हा युक्तिवाद नाकारत तातडीने काम पूर्ण करण्याचा ठाम आदेश दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे नाशिक महापालिकेच्या रस्ते विकास कामांवर 'डांबर संकट' निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांत परिस्थिती कशी हाताळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रवींद्र धारणकर, प्रभारी शहर अभियंता, मनपा