Nashik Gangapur Dam | जलवाहिनी कामास विलंब; प्रतिदिन अडीच लाख दंड

Nashik Gangapur Dam | संबंधित ठेकेदारावर १ ते १५ मेदरम्यान प्रतिदिन एक लाख रुपये, तर, १६ मेपासून प्रतिदिन अडीच लाख रुपये दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Nashik Gangapur Dam
Nashik Gangapur Dam pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापूर धरण थेट जलवाहिनी कामाला दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतरही काम पूर्ण झालेले नसल्यामुळे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी ठेकेदारावर कारवाईचा कठोर निर्णय घेतला आहे. संबंधित ठेकेदारावर १ ते १५ मेदरम्यान प्रतिदिन एक लाख रुपये, तर, १६ मेपासून प्रतिदिन अडीच लाख रुपये दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Nashik Gangapur Dam
Tender scam : जलसंपदात तक्रारींचा पाऊस, कारवाईचा दुष्काळ

दि. ३० जूनपर्यंत काम पूर्ण न केल्यास ठेकेदारावरील कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिले आहेत. शहराला मुख्यतः गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणावरील पंपिंग स्टेशनमधून पाणी उचलून ते थेट जलवाहिनीद्वारे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविले जाते.

यासाठी १९९७ मध्ये १,२०० मिमी व्यासाच्या दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या २६ वर्षांत या जलवाहिन्यांची वहन क्षमता कमी झाली असून, वारंवार गळतीच्या घटनांमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान १२.५० किलोमीटर लांबीची, १,८०० मिमी व्यासाची आणि ४२५ एमएलडी क्षमतेची नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगातून १७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याची मूळ मुदत होती. मात्र विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे या योजनेचे काम लांबले. त्यामुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. दि. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश होते.

Nashik Gangapur Dam
Iirrigation department corruption : स्पर्धा वाढली की, निविदा होतात रद्द

परंतु, या मुदतीतही काम पूर्ण न झाल्यामुळे २५ मेपर्यंत दुसरी मुदतवाढ दिली गेली. मात्र, दुसऱ्यांदा दिलेली मुदतही उलटल्यामुळे अखेर महापलिकेने ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. १ ते १५ मेदरम्यान प्रतिदिन एक लाख रुपये, तर १६ मेपासून ३० जूनपर्यंत अडीच लाख रुपये प्रतिदिन दंड ठेकेदाराकडून वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

९५ टक्के काम पूर्ण

सध्या जलवाहिनीचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे. उर्वरित काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे हमीपत्रही महापालिकेकडे सादर केले आहे. या मुदतीतही काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारावरील कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.

गंगापूर धरण थेट जलवाहिनीचे काम मुदतीत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु मुदतवाढीनंतरही काम पूर्ण न केल्याने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जूनपर्यंत काम पूर्ण न केल्यास कारवाई तीव्र केली जाईल.

- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news