नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागामार्फत फेरीवाल्यांच्या तक्रारी निराकरणासाठी तक्रार निवारण व विवाद निर्णय समितीची स्थापना करण्यात येत आहे. या समितीवरील दोन व्यावसायिक सदस्यांच्या नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छुकांनी २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. केंद्र शासनाच्या पथविक्रेता कायद्यातील तरतुदीनुसार ही समिती गठीत करण्यात येत आहे. समितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश किंवा न्याय दंडाधिकारी असतील, तर त्यांच्यासोबत दोन व्यावसायिक सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार आहे. व्यावसायिक सदस्यपदासाठी अर्जदाराचे वय ३५ ते ६२ वर्षांदरम्यान असणे आवश्यक असून, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, स्थानिक प्राधिकरणातील किमान १० वर्षांचा अनुभव तसेच अवर सचिव किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावर काम केल्याचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक प्रशासन, सामाजिक कार्य किंवा पथविक्रेत्यांशी संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्या आणि चांगली प्रतिष्ठा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिकेच्या सेवेत कार्य केलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.
इच्छुकांनी पदवी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, वयाचा दाखला आणि ओळखपत्रासह अर्ज महापालिकेच्या मुख्यालयातील राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागाच्या कार्यालयात जमा करावेत. पात्रतेपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास अंतिम निवडीचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे राहतील, अशी माहिती उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली.