

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्याची चाहुल लागल्याने नाशिक महापालिकेने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि रस्त्यांची दुरवस्था टाळण्यासाठी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. नाशिक शहरातील विविध भागांत सुरू असलेली सर्व प्रकारची रस्ते खोदकामाची कामे गुरुवार (दि.४) पर्यंत पूर्ण करण्याचे किंवा आहे त्या स्थितीत त्वरित बंद करण्याचे आदेश महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी जारी केले आहेत.
सध्या महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, मलनिःसारण विभाग, विद्युत विभाग आणि स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकासकामे प्रगतिपथावर आहेत. यासोबतच भारत दूरसंचार निगम (बीएसएनएल), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण), विविध खासगी सेल्युलर कंपन्या आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) यांच्यामार्फत शहरात ओएफसी केबल, विद्युतवाहिनी आणि गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदाई सुरू आहे.
मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर या खोदलेल्या रस्त्यांवर ओघळ्या व खड्डे पडण्याची आणि संभाव्य अपघात होण्याची दाट शक्यता असते. हे लक्षात घेऊन मनपाने खोदकामासाठी ४ जून ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. ऐन पावसाळ्यात खोदलेल्या रस्त्यांची तांत्रिक निकषांनुसार तत्काळ दुरुस्ती करणे सार्वजनिक बांधकाम विभागास शक्य होणार नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून रस्ते खचणार नाहीत किंवा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही, याचे चोख नियोजन व दक्षता घेण्याचे आदेश सर्व कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि संबंधित संस्थांना देण्यात आले आहेत.
सदर परिपत्रकाची प्रत नाशिक मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महावितरण व संबंधित टेलिकॉम कंपन्यांच्या व्यवस्थापकांना तत्काळ अंमलबजावणी व काटेकोर कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.
रस्ते पूर्ववत करणे बंधनकारकः खोदाई करण्यात आलेले सर्व रस्ते संबंधित विभाग आणि कंपन्यांनी ४ जून २०२६ पूर्वी तांत्रिक निकषांनुसार दुरुस्त करून पूर्ववत करणे आवश्यक आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत नवीन खोदकामास बंदीः पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नाशिक महानगरपालिकेकडून कोणत्याही नवीन ओएफसी केबल, गॅस पाइपलाइन किंवा इतर कामांसाठी रस्ता खोदण्याची परवानगी दिली जाणार नाही.
अपघातांची जबाबदारी कंपन्यांवरः ४ जूननंतरही जर कोणत्याही कंपनीने किंवा विभागाने खोदकाम सुरू ठेवले आणि त्यामुळे एखादा संभाव्य अपघात घडला, तर त्याची संपूर्ण कायदेशीर व आर्थिक जबाबदारी संबंधित खोदाई करणारी कंपनी आणि विभागाची राहील.
एमएनजीएलला कडक इशाराः एमएनजीएलने गॅस पाइपलाइनचे काम संपताच रस्ता त्वरित बुजवून तेथील संपूर्ण राडारोड (मलबा) त्वरित उचलून घ्यावा, अन्यथा त्यांच्यावर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मनपाने दिला आहे.