

नाशिक : नाशिकला जागतिक दर्जाचे कुशल कामगार निर्मितीचे हब बनविण्याचा निर्धार टाटाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे अधिकारी व नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा पदाधिकारी यांच्या संयुक्त नवीन कोर्स प्रारंभप्रसंगी बैठकीत व्यक्त करण्यात आला.
नाशिकमध्ये कौशल्य विकास केंद्र (स्किल सेंटर) उभारून त्याद्वारे प्रगत उत्पादन क्षेत्रात कामगारांना सक्षम बनवण्याच्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. याबाबतच्या सामंजस्य करारावर निमा आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूततर्फे काही महिन्यांपूर्वी स्वाक्षऱ्या केल्यानंतर, बैठका पार पडल्या. निमामधे झालेल्या बैठकीत टाटा इंडियन इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी इन्स्टिट्यूटतर्फे मुंबई आणि अहमदाबाद येथे राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली.
यावेळी नाशिकच्या कामगारांसाठी आवश्यक आणि पोषक अभ्यासक्रम असलेल्या सीएनसी मायलिंग, टर्निंग तसेच रोबॉटिक्स प्रणालीसाठी नवीन ऑपरेटर निर्मितीवर भर देण्याचा तसेच कामगारांना मुंबईपेक्षा नाशिकमध्येच प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा आग्रह निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केला होता. तसेच दहावी आणि बारावी उत्तीर्ण हा निकष निश्चित करून तांत्रिक आणि अतांत्रिक या दोन्ही क्षेत्रातील कामगारांना आपण प्रशिक्षण देऊ शकतो. कामगारांच्या अपग्रेडेशनचा अभ्यासक्रमही राबवू शकतो, असाही विचार पुढे आला होता.
त्यानुसार नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला जास्तीत जास्त मनुष्यबळ स्किल सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्याचा मानस राहील व टाटातर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मशीनवर प्रशिक्षण दिले जाईल, असे टाटा आयआयएसचे मुख्य प्रशिक्षक एस. जगन्नाथन आणि प्रकल्प व्यवस्थापक श्रेयस पाटकर यांनी सांगितले. यावेळी मुख्य व्यवस्थापक मंगेश भूपती, नितीन अवैया, सायली काकडे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी निमा उपाध्यक्ष के. एल. राठी, मनिष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सचिन कंकरेज, सुधीर बडगुजर, मिलिंद रजपूत, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, अनिल मंत्री आदी उपस्थित होते.
---
केवळ देशालाच नव्हे तर जगाला कुशल मनुष्यबळ पुरविण्याचा आमचा मानस आहे. नाशिकमधून उद्योग क्षेत्रासाठी अधिकाधिक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- एस. जगन्नाथन, मुख्य प्रशिक्षक, टाटा आयआयएस
---