

अन्य शिक्षणक्रमांच्या तुलनेने शिक्षणासाठी लागणारा कमी खर्च
रोजगाराच्या विपुल संधी यामुळे शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) त शिक्षण घेण्याकडे तरुणाईचा कल
आयटीआयच्या काैशल्याला प्रतिष्ठा : श्रमिक न म्हणता तंत्रज्ञ म्हणून ओळख
नाशिक : निल कुलकर्णी
वाढत्या उद्योगसंस्था, अन्य शिक्षणक्रमांच्या तुलनेने शिक्षणासाठी लागणारा कमी खर्च, शिक्षण होण्यापूर्वीच कॅम्पस मुलाखती, वाढत्या उद्योगसंस्थांमुळे तंत्रज्ञानाची वाढलेली गरज, रोजगाराच्या विपुल संधी यामुळे शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) त शिक्षण घेण्याकडे तरुणाईचा कल वाढत चालला आहे. 'आयटीआय' अभ्यासक्रमांकडे मुलांचा कल पूर्वीपासूनच अधिक असून, प्रतिवर्षी शिक्षण घेणाऱ्या मुलींचा आलेखही वाढत असल्याची माहिती आयटीआयमधील संचालक, प्राचार्य, अभ्यासक देत आहेत.
आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना कंपन्यांमधील श्रमिक कामगार म्हणून ओळखले जाते. आता त्यांच्या काैशल्याला प्रतिष्ठा मिळाली असून, त्यांना श्रमिक न म्हणता तंत्रज्ञ म्हणून ओळखले जाते. रोबोटिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय)ने सर्वच क्षेत्रात क्रांती झाली असली तरी कुशल तंत्रज्ञाची उद्योगजगतातील गरज कायम आहे.
गेल्या पाच वर्षांतील 'आयटीआय' शिक्षणक्रमांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता दरवर्षी यात वाढ झालेली दिसून येते. २०२० मध्ये राज्यात ९८ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी 'आयटीआय'ला प्रवेेश घेतला. २०२२ मध्ये ती १ लाख ३ हजार ३२२ इतकी वाढली. २०२३ मध्ये १ लाख ५ हजार ३४३ इतकी वाढल्याचे दिसून आले. ही संख्या केवळ शासनाच्या 'आयटीआय' संस्थांमधील असून, यात खासगी 'आयटीआय' संस्थांची आकडेवारी अधिक केल्यास हा आकडा प्रत्येक वर्षी वाढला असल्याचे चित्र आहे. केवळ मुलेच नाही तर मुलींचाही आयटीआय शिक्षण घेण्याकडे कल वाढला आहे.
पूर्वी महिलांचा कल कॉस्मोटॉलॉजी, फॅशन तंत्रज्ञान याकडे होता परंतु आता मुलीही इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वायरमन, रेफ्रिजरेशन एअरकंडिंशनिंग (आरएसी) या केवळ पुरुषांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. कोर्स पूर्ण होण्याआधीच कॅम्पस मुलाखतीमुळे तत्काळ रोजगाराची संधीही मिळत असल्याने युवा पिढीचा आयटीआय शिक्षण घेण्याकडे कल वाढला असल्याची माहिती संत मीराबाई शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्था (महिला) 'आयटीआय'चे प्राचार्य दीपक बाविस्कर यांनी दिली.
हल्ली दीर्घ मुदतीचे कोर्स करण्यापेक्षा अल्प मुदतीचे कोर्स करून तत्काळ पैसा कमवण्याकडे नव्या पिढीचा कल दिसून येतो. त्यामुळेही आयटीआयला पसंती मिळत असल्याची माहिती अभ्यासक देत आहेत.
'आयटीआय' प्रशिक्षितांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त - हमखास नोकरीची हमी आणि झटपट रोजगार यामुळे 'आयटीआय' शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. औद्योगिक विकासाचा आलेख उंचावत आहे. काही वर्षांपूर्वी उद्योगसंस्था अल्पशिक्षित अन्य प्रांतीयांना नाेकरीवर ठेवत, परंतु त्यांच्या उत्पादनाचा दर्जा घसरत गेला. प्रत्येक कंपन्या 'आयटीआय' कुशल मनुष्यबळाची मागणी करतात. 'आयटीआय' प्रशिक्षित उमेदवारांना हल्ली कामगार म्हणून न बघता त्यांनाही सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
रवींद्र मुंडासे, उपसंचालक, मुलांचे आयटीआय, नाशिक
आयटीआयची राज्यातील सांख्यिकी
सरकारी आयटीआय - ४१६
खासगी आयटीआय- ५७९
विभागातील आयटीआय
सरकारी आयटीआय- ६८
खासगी आयटीआय- १५४
'कॅम्पस इंटरव्ह्यू'मुळे मुलींना तत्काळ नोकरीच्या संधी - मुलांचे म्हणून ओळखले जाणाऱ्या फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वायरमन, रेफ्रिजरेशन एअरकंडिंशनिंग आदी अभ्यासक्रमांत मुली स्वत:ला सिद्ध करत आहेत. कंपन्याही महिलांची उत्पादन साखळी निर्माण करत आहेत. त्यामुळे महिलांना तंत्रज्ञ म्हणून मोठी मागणी आहे. प्रत्येक शासकीय आयटीआयमध्ये 'कॅम्पस इंटरव्ह्यू' घेतले जात असल्याने तत्काळ नोकरीच्या संधी मुलींना उपलब्ध होत आहे. चालू वर्षात ४०० पैकी २५० विद्यार्थिनींना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मुलींचा ओढा दरवर्षी आयटीआय शिक्षणाकडे वाढत आहे.
दीपक बाविस्कर, प्राचार्य, मुलींचे आयटीआय, नाशिक