Nashik | ‘सरकारी काम आणि ….’ म्हणीला निफाडच्या नवनियुक्तांचा छेद

Nashik | ‘सरकारी काम आणि ….’ म्हणीला निफाडच्या नवनियुक्तांचा छेद

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि कामाप्रति असलेली अनास्था यावरून 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' अशी म्हण प्रचलित झाली, परंतु यास निफाडचे नवनियुक्त तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी छेद देत दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णाच्या परिवाराला अवघ्या चार तासांत रेशनकार्ड (Ration card) दिले. त्यामुळे रुग्णावर तत्काळ उपचार होण्यास मदत झाली.

ओझर येथील एका सर्वसामान्य परिवारातील व्यक्तीला एका दुर्धर आजाराचे वैद्यकीय तपासणीअंती निदान झाले. वैद्यकीय उपचारासासाठी मोठा खर्च लागणार होता. शासनाच्या वैद्यकीय योजनेतून या खर्चाचा भार हलका होणार होता. परंतु, त्यासाठी रेशनकार्ड (Ration card) आवश्यक होते. मात्र, या परिवाराकडे रेशनकार्डच नसल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले. नवीन रेशनकार्डसाठी त्यांनी चौकशी केली असता त्यांना यासाठी किमान दोन-तीन महिने लागतील, असे समजले. हे कुटुंब परजिल्ह्यातील आहे. जवळचे कोणीच नातेवाईक नसल्याने पत्नीसमोर पतीच्या उपचाराचा मोठा प्रश्न उभा ठाकला. या बाबतची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी या परिवाराची भेट घेत नवीन रेशनकार्डसाठी (Ration card) लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून थेट तहसीलदार विशाल नाईकवाडे यांची भेट घेतली. एकूणच परिस्थितीची माहिती देत सहकार्याची विनंती केली. तहसीलदारांनी तत्काळ कागदपत्रांची छाननी करून पुरवठा विभागास रेशनकार्ड देण्याचे आदेश दिले. त्यानुसार अवघ्या चार तासांत कार्यवाही होऊन या परिवाराला रेशनकार्ड (Ration card) देण्यात आले. या अनपेक्षित अनुभवाने त्या महिलेला अश्रू अनावर झाले.

प्रशासकीय कामकाज करताना समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा माझा कायमच प्रयत्न राहील. कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही. – विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड.

नवीन रेशन कार्डसाठी खूप मोठा कालावधी लागणार होता. परंतु, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या रूपाने आमच्यासाठी देवदूतच धावून आला. – सीमा खर्च, ओझर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news