

नाशिक : शेतकऱ्यांना शेती पीककर्ज वाटपासाठी नाबार्ड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून फेरकर्ज उपलब्ध करून देते. मात्र, मागील चार वर्षांपासून नाशिक जिल्हा बॅंकेचा संचित तोटा व एनपीए मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य बॅंकेकडून पीककर्जासाठी फेरकर्ज मिळालेले नाही.
नाशिक जिल्हा बॅंकेची राज्य सहकारी बॅंक आता संस्थात्मक सल्लागार झाली आहे. त्यामुळे प्रशासक विद्याधर अनास्कर शेतकऱ्यांना पीककर्जपुरवठा करण्यासाठी जिल्हा बॅंकेला सवलतीच्या दरात फेरकर्ज उपलब्ध करून देतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा बॅंक ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्जपुरवठा करत असते. नाशिक जिल्हा बॅंकेने आतापर्यंत विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत हा नियमित पीककर्जपुरवठा सुरू होता. शेतकऱ्यांची पीककर्जाची मागणी वाढली की, जिल्हा बॅंक ही महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेकडून फेरकर्ज घेऊन शेतकऱ्यांना पीककर्ज देत होती. साधारणत: दरवर्षी 500 ते 600 कोटींचे हे फेरकर्ज घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा बॅंक पीककर्ज देत होती. त्यासाठी जिल्हा बॅंक एक टक्का तोटा सहन करत होती. या फेरकर्जाची परतफेड नियमित होत असल्यामुळे जिल्हा बॅंकेला हे कर्ज दरवर्षी मिळत होते. परंतु, तीन ते चार वर्षांपासून वसुली झाली नसल्याने बॅंकेचा संचित तोटा वाढत गेला परिणामी बॅंकेचा एनपीए वाढला. त्यामुळे नाशिक जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीच सापडली आहे. जिल्हा बॅंक अडचणीत सापडल्याने राज्य सहकारी बॅंकेने फेरकर्ज देणेदेखील बंद केले आहे. चार वर्षांपासून पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बॅंकेला राज्य बॅंकेने मदत केलेली नाही. जिल्हा बॅंकेकडे पुरेसा निधी नसल्याने बॅंकेला शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे बंधन येत आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅंकेची राज्य सहकारी बॅंक आता संस्थात्मक सल्लागार झाली आहे. पर्यायाने बॅंकेची धुरा राज्य बॅंकेचे प्रशासक अनास्कर यांच्याकडे आहे. अनास्कर यांना जिल्हा बॅंकेची आर्थिक स्थिती, थकबाकी याबाबत सर्व माहिती आहे. त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाददेखील साधलेला आहे. हे फेरकर्ज देऊन, ते परतफेड करण्याची तरतूद याबाबत अनास्कर निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे अनास्कर यांनी जिल्हा बॅंकेला फेरकर्जपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा अन शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे, अशी मागणी आता होत आहे.
जिल्हा बॅंक शेतकऱ्यांना पीककर्ज देणारी एकमेव बॅंक आहे. मात्र, कर्जमाफी शासनाच्या घोषणेने जिल्हा बॅंक आर्थिक अडचणीत सापडली आहे. राज्य सहकारी बॅंक ही जिल्हा बॅंकेची पालक असून, त्यांची ती जबाबदारी आहे. आतापर्यंत पीककर्जासाठी राज्य बॅंकेने मदत केली आहे. त्यामुळे आताही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीककर्जपुरवठा करण्यासाठी राज्य बॅंकेने फेरकर्जाच्या माध्यमातून मदत करावी.
शिरीष कोतवाल, माजी अध्यक्ष, जिल्हा बॅंक, नाशिक.