

नाशिक, डॉ. राहुल रनाळकर
शहरासह जिल्ह्यातील खाजगी क्लासेसच्या संचालकांचा ‘शिक्षकरत्न’ पुरस्कार देताना निर्माण झालेलं वातावरण केवळ सन्मानापुरतं मर्यादित नव्हतं; ते भविष्यातील भारताच्या दिशादर्शनाचं व्यासपीठ ठरलं. दैनिक पुढारी आणि संदीप सायन्स इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित या सोहळ्यात पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे उपस्थित होते. केवळ उपस्थित नव्हते, तर त्यांनी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद करताना आजच्या भारताला सर्वाधिक भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांना थेट स्पर्श केला.
आमदार तांबे यांनी मांडलेला मुख्य मुद्दा स्पष्ट होता, 2047 पर्यंत विकसित भारत घडवायचा असेल, तर चाकोरीबद्ध विचारांच्या चौकटी आधी मोडायला हव्यात. उभ्या भारताच्या कण्याने, म्हणजेच युवा पिढीने, कौशल्य, कल्पकता आणि वैश्विक दृष्टीकोन आत्मसात करून स्वतःला जगाच्या गरजांशी जुळवून घ्यावं लागेल. कारण जग वेगाने बदलत आहे; स्पर्धा, तंत्रज्ञान, अर्थकारण सगळं दर तासाला बदलतंय. या बदलांची लाट जर युवकांनी आधी ओळखली नाही तर बदल त्यांना ओढून नेतील.
आज भारताच्या प्रगतीची सूत्रं ज्यांच्या हाती आहेत, त्या युवा पिढीने समस्या ओळखण्याची क्षमता, त्यावर उपाय शोधण्याची तयारी आणि नव्या दृष्टीने विचार करण्याचं सामर्थ्य आत्मसात केलं पाहिजे. अन्यथा विकसित भारत ही केवळ घोषणा राहील.
भारताची ताकद मोठी, पण उपयोग कमी, दिशाहीन मनुष्यबळाची शोकांतिका आहे. हा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, भारताकडे प्रचंड मनुष्यबळ आहे; पण त्याला दिशा नाही. आज जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, तैवान, सिंगापूर, हाँगकाँग यांसारख्या छोट्या देशांमध्येही मनुष्यबळाचा उपयोग ज्या पद्धतीने केला जातो, त्याच्या तुलनेत आपण भयंकर मागे आहोत. आपला तरुण वर्ग प्रतिभावान आहे. परिश्रमशील आहे. जग जिंकण्याची क्षमता त्यांच्यात आहे. पण समस्या एकच, कौशल्याचा अभाव. दहावी- बारावीनंतर पारंपरिक क्षेत्रांमध्येच करिअर करायचं, हाच एकमेव मार्ग आहे, असा समज अनेक कुटुंबांमध्ये आजही कायम आहे. आणि याचा परिणाम काय?
अभियांत्रिकीच्या लाखो पदव्या, पदविका, बी.ए., बी.कॉम. यांच्या पदव्या पण योग्य कौशल्य नसल्याने नोकऱ्या नाहीत. आणि नोकऱ्या नसल्याने निराशा, असंतोष, बेरोजगारी एकीकडे सरकार विकसित भारताचे स्वप्न दाखवत आहे, तर दुसरीकडे शाळा- कॉलेजमध्ये कौशल्याधारित शिक्षणाची कमतरता लोकांना मागे खेचते आहे. हाच भारताचा सर्वात मोठा विरोधाभास आहे.
अपेक्षा वाढल्या? मग जबाबदारीही तेवढी वाढली पाहिजे
आज समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. चांगलं जीवनमान, चांगली नोकरी, चांगलं घर, चांगला व्यवसाय आणि समाजात आदर. मात्र या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची? सरकारची? नाही. ही जबाबदारी कुटुंबाची आणि स्वतः युवा पिढीची आहे. ज्या पिढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्यांनीच आयुष्याचं नियोजनही करायला हवं. जगात सर्वात महाग वस्तू कोणती आहे तर ‘फोकस’. आज युवक एकाच वेळी पाच गोष्टी करत आहेत. पण एका गोष्टीतही सर्वोत्तम नाहीत. कारण दिशा नाही.
सोशल मीडियाचा सुयोग्य वापर; महत्वाचा पण दुर्लक्षित मुद्दा
आजच्या पिढीसाठी मोबाइल म्हणजे हातात ठेवलेलं जग आहे. पण या जगाचा वापर कसा करायचा? सोशल मीडिया हे नुसतं वेळ मारून नेण्याचं साधन नाही; ते ज्ञान, करिअर, नेटवर्किंग, रोजगार, व्यवसाय आणि नवनिर्मितीचं शक्तिशाली माध्यम आहे. पण आज बहुतेक युवक त्याचा वापर फक्त मनोरंजनापुरता करतात. रील्स, फॉलोअर्स व्हायरल होण्याच्या स्पर्धा आणि आभासी जगात पूर्ण जीव अडकवलेला. हे वास्तव बदलायला हवं. सोशल मीडिया हा साधन आहे; उद्दिष्ट नाही. सोशल मीडिया ‘सुयोग्य वापरा’च्या टीप्स प्रत्यक्ष आयुष्यात लागू करणं काळाची गरज आहे.
प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, विकसित भारताचा मूळ पाया
जगात आज ज्या देशांनी झेप घेतली, त्यांनी समस्याच संधी म्हणून घेतल्या.
तैवानने इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात जग जिंकले
सिंगापूरने भूभाग नसताना जागतिक व्यापार केंद्र उभं केलं
जर्मनीने कौशल्य आधारित शिक्षणातून जगभर उद्योग नेते घडवले.
भारताकडे समस्या अनंत आहेत. पाणी, वाहतूक, प्रदूषण, शेती, तंत्रज्ञान, आरोग्य, नोकरी, शिक्षण प्रत्येक - - क्षेत्रात पर्वताएवढ्या अडचणी आहेत. मात्र या अडचणीच तर संधी आहेत. याच समस्यांवर उपाय शोधणारी - पिढी विकसित भारत घडवेल. पण युवावर्गात ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ हा विचारच रुजलेला नाही. यासाठी शिक्षक, पालक, समाजातील ज्येष्ठ यांनी युवकांना मार्गदर्शन करायला हवं.
विकसित भारत फक्त घोषणा नाही, तर कठोर प्रयत्नांची मागणी. आज देशात ठिकठिकाणी विकसित भारताचे कार्यक्रम, परिषद, चर्चा सुरू आहेत. पण खरी गोष्ट अशी आहे. हे प्रयत्न अपुरे आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व समाजघटक यात सहभागी नाहीत, शिक्षणव्यवस्थेत बदल मंद गतीने होत आहेत. उद्योग-व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी कमी होत चालली आहे. सरकार ते नागरिक सगळीकडे विस्कळीत दृष्टीकोन दिसून येतो. आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे निराशा आणि पराभवाची भीती, अपयशाची लाज आणि प्रयत्न न करण्याची वृत्ती. यावर उपाय म्हणून स्वतंत्र यंत्रणा निर्माण होण्याची गरज आहे. युवकांना अपयशातून उभं करणारी यंत्रणा, या क्षेत्रात आपण मागे आहोत.
नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची तातडीची गरज सर्व क्षेत्रांसाठी लागू आहे. देशाला आज केवळ ‘चारित्र्यवान पिढी’ नाही, तर नवोन्मेषी आणि धाडसी पिढी हवी आहे. उद्योग, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सहकार, खेळ, पर्यटन, फार्मा, संस्कृती. या सगळ्या क्षेत्रांना जुने मार्ग सोडून नवे विचार स्वीकारण्याची वेळ आली आहे. प्रत्येक क्षेत्राला ‘डिस्रप्शन’ची गरज आहे. साचलेला, बुरशी लागलेला विचार पाडून नवीन दृष्टीकोन उभारला नाही तर भारत 2047 चे लक्ष्य चुकवेल.
समाजाने पुढे येण्याची वेळ, राजकीय व्यक्ती किंवा सरकारकडून सर्व अपेक्षा ठेवू नका. विकसित भारताचे स्वप्न केवळ सरकार, पंतप्रधान, जिल्हाधिकारी किंवा आमदारांच्या हातात नाही. हे स्वप्न प्रत्यक्षात आणणारी शक्ती आहे, ती म्हणजे समाज.
उद्योगांनी नाविन्य स्वीकारलं पाहिजे.
शिक्षकांनी शिक्षण अधिक कौशल्याधारित करावं.
पालकांनी मुलांना प्रयोग करायला मोकळीक द्यावी.
समाजाने अपयश स्वीकारणारी मानसिकता विकसित करावी
युवकांनी तयारीने, धैर्याने पुढे यायला हवं.
जर प्रत्येक समाजघटकाने योगदान दिलं, तरच 2047 चं स्वप्न सत्यात उतरेल.
युवा पिढीच भारताचा खरा पाया
आज विकसित भारताच्या दिशेने धाव घ्यायची असेल, तर सर्वात मोठी गुंतवणूक युवा पिढीवर करावी लागेल. त्यांना दिशा, प्रशिक्षण, संधी, मार्गदर्शन आणि विश्वास दिला नाही, तर भारताची युवा शक्ती हाच देशाचा सर्वात मोठा गमावलेला ‘अॅसेट’ ठरेल. भारताकडे वेळ कमी आहे. जग वाट पाहणार नाही. युवा पिढीने पुढे यायलाच हवं. विकसित भारताचा पाया कोणी घालणार? सरकार? नाही. ते घडवणार युवा पिढी. ते घडवणार आपण. यासाठी युवा पिढी हीच नव्या भारताची शिल्पकार, असे म्हणणे यथार्थ ठरेल.