नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - भावाकडून रक्षाबंधनाची ओवाळणी लाडक्या बहिणींच्या खात्यात पडल्याने बहिणींना आनंद गगानात मावेनासा झाला आहे. रक्षाबंधनापूर्वीच पैसे मिळाल्याने ओवाळणी मिळाली. राज्यभरातील लाडक्या बहिणींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे आभारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हफ्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास १४ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. काही बहिणींना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तर काहींना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 16) सकाळी 8.30 वाजेपासून खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे.
राज्यभरातील बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरता नसून ही योजना कायम राहणार आहे. योजनेकरीता आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली असून बहिणींना योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील लाडक्या बहिणींना दिली आहे.
महायुती सरकारने आश्वासनाची पूर्तता केली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी मिळण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक बहिणींच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा झाले आहेत. ज्यांनी जुलै महिन्यात अर्ज केला होता अशा लाभार्थ्यांना जुलै २०२४ आणि ऑगस्ट २०२४ या दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेनुसार लाभार्थ्यांचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा झाले आहेत.