

नाशिक: जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या नियोजनाची तब्बल पाच तास माहिती घेत सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी करून दाखल झालेल्या गुन्ह्यांचा अहवाल सदर करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हा दक्षता समिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, सहाय्य्क आयुक्त नगरविकास शाम गोसावी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, मालेगाव महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील, अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साळवे आदींसह आरोग्य यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आशा कार्यक्रम, इ-सुश्रृत, इ-संजीवनी ओपीडी, सिकलसेल मिशन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम यांचा आढावा घेतला.
या दिल्या सूचना
सोनोग्राफी केंद्रासह, शरीर तपासणीची (स्कॅनिंग) ठिकाणांची नियमित तपासणी करावी. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत दाखल गुन्हांचा सद्यस्थिती अहवाल सादर करावा. मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणीसाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. क्षयरोग, कृष्ठरोग निर्मूलनासाठी गृहभेटीद्वारे रूग्णांची तपासणी करावी. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील बालकांची नेत्रतपासणी करून मोफत चष्माचे वाटप करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
एचआयव्ही रुग्णांना सेवा पुरावा
एचआयव्ही बाधिताना आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी करावी. या रूग्णांना मोफत उपचाराची सोय उपलब्ध होण्यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत या योजनांद्वारे सुचीबद्ध करण्यात येणाऱ्या रूग्णालयांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही प्रसाद यांनी दिल्या.