

नाशिक : भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाकडून काळज़ी घेण्यात येत असून रविवारी (दि. 11) हल्ला झाल्यास नागरी संरक्षण दल आणि स्मार्टसिटीच्यावतीने शहरात 192 ठिकाणी सायरन वाजवून नागरिकांना जागृत करण्यात आले. शहरातील मुख्य चौक आणि इतर ठिकाणी सायरन वाजल्याने नागरिकांमध्ये हा कुतुहलाचा विषय ठरला.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर नाशिक शहरात मॉकड्रील आणि सायनची टेस्टींग घेण्यात येत आहे. नाशिक तालुक्यात 15 मेपर्यंत 12 ठिकाणी मॉकड्रील करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांनूसार स्मार्टसिटीकडून सायरनची टेस्टींग सुरु आहे. शनिवारी 200 ठिकाणी तर रविवारी (दि.11) रोजी 192 ठिकाणी सायरन वाजविण्यात आला.
युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी साडे दहा वाजता जिल्हा प्रशासनाकडून दक्षता बैठक घेण्यात येत असून बैठकीत जिल्हाधिकार्यांकडून आवश्यक सूचना देण्यात येत आहे. त्यानूसार सायरनची टेस्टींग घेण्यात येत आहे. नागरिकांची धावपळ होऊ नये यासाठी टेस्टींग घेण्याच्या 15 मिनीटे अगोदर नागरिकांना सायरनविषयी सूचना देण्यात येत असते.
सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नाशिक
भारत पाकिस्तानमध्ये युध्दबंदीनंतरही जिल्हा प्रशासनाकडून मॉकड्रील आणि सायरनची टेस्टींग घेण्यात येत आहे. रविवारी सायरनची टेस्टींग दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांमध्ये धावपळ उडाली. युध्दबंदीनंतरही सायरन वाजत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि कौतुहल एकाचवेळी दिसून आले. याबाबत नागरिकांकडून प्रशासनाकडे चौकशीही करण्यात आली.
युध्दबंदी झाली असली तरी सायनची टेस्टींग थांबविण्याच्या सूचना अद्याप देण्यात आलेल्या नाहीत यामुळे सायरनची टेस्टींग जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार सुरुच राहणार आहे. युध्दजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी काय काळजी घ्यावी प्रशासनाने कशाप्रकारे नागरिकांची मदत करावी, हल्ला झाल्यास जखमींना कमीत कमी वेळेत कशाप्रकारे रुग्णालयात पोहोचवावे, अडकलेल्या नागरिकांची कशाप्रकारे सुटका करावी याबाबतीही मॉकड्रील सुरुच राहणार आहे.