

नाशिक : जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नाशिकमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘आतंकवाद नहीं सहेंगे’ अशा घोषणा देताना पाकिस्तानी दहशतवादाला चोख उत्तर देण्याची आग्रही मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
‘अभाविप’चे प्रदेश सहमंत्री व महानगरमंत्री ओम मालुंजकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी मालुंजकर म्हणाले, पहेलगाम येथे देशातील विविध भागातून आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून निर्ममपणे हत्या करण्यात आली. इस्लामिक दहशतवादाच्या माध्यमातून भारतातील हिंदूंच्या हत्या करणे हे या देशातील नागरिक कदापि सहन करणार नाहीत. पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या आतंकवादी संघटना पाकिस्तान पुरस्कृत असून या दहशतवादाला त्यांच्याच शब्दात चोख उत्तर देणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राइक आणि एयर स्ट्राइक करून केंद्र सरकारने मागील दहशतवादाला उत्तर दिले होते. तशाच पद्धतीचे चोख प्रतिउत्तर केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणीही मालुंजकर यांनी केली.
या आंदोलनात प्रदेश सहमंत्री मेघा शिरगावे, महानगर सहमंत्री पियुषा हिंगमिरे, अक्षता देशपांडे, व्यंकटेश औसरकर, योगेश महाजन, मोनाली महाजन, सार्थक आहेर, शुभम कुलकर्णी, अश्विनी राठोड, ओमकार आहेर, किशोरी सावकार, अक्षय गुंजाळ आदी सहभागी झाले होते.