

नाशिक : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी गोळीबार करीत २७ जणांची हत्या केली. या घटनेनंतर देशविदेशातील पर्यटकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र जम्मू काश्मिरमधील स्थानिक नागरिक व भारतीय सैन्य दलाचे जवान पर्यटकांसोबत नियमीत संवाद साधत त्यांना धीर देत आहेत. तसेच 'डरो मत, हम सब भारतीय है' असे बोलून घडलेल्या घटनेचा व दहशतवादाचा विरोध करीत आहे.
सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळी गजबजली असून, अनेक पर्यटकांनी जम्मू काश्मिरला पसंती दिली आहे. मात्र पहलगाम येथील जंगलात गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला करीत गोळीबार करून जीवे मारले. त्यात दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले. या घटनेने पर्यटकांमध्ये सुरक्षीततेच्या कारणामुळे घबराट पसरली. मात्र, जम्मू काश्मिरसह इतर भागात असलेल्या पर्यटकांना स्थानिक नागरिक धीर देत आहे. नाशिक जिल्ह्यातील व सध्या श्रीनगर येथे थांबलेल्या राहुल अग्निहोत्री, रामदास बाबर, दीपक अभंग, सुर्यकांत कदम, रामचंद्र जाधव यांच्या अनुभवानुसार, गाेळीबाराची घटना घडली ते ठिकाण निर्मनुष्य आहे. मात्र इतर ठिकाणी सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून सर्व खबरदारी घेतलेल्या आहेत. तसेच स्थानिक नागरिक, व्यावसायिक, रिक्षा, वाहन चालक आपुलकीने चौकशी करीत न घाबरण्याचा सल्ला देत आहेत. तसेच सर्वात पहिले आपण भारतीय आहोत, ही भावना अंगी ठेवून स्थानिक नागरिक पर्यटकांशी संवाद साधत आहे. तसेच घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत आहे. दरम्यान, काही पर्यटक पुन्हा घरी जाण्यासाठी आग्रही असले तरी विमान कंपन्यांनी विमान प्रवासाचे दर अव्वाच्या सव्वा केल्याने पर्यटकांनी नाराजी वर्तवली आहे. दरम्यान, भारतीय सैन्य दलानेही पर्यटकांना धीर देत न घाबरण्याचे आवाहन केले आहे. सैन्य दलाचे जवान ठिकठिकाणी तैनात असून, त्यामुळे दिलासा मिळत असल्याचे पर्यटकांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुखरुप आहेत. त्यांची निवास, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पर्यटकांचे परतण्यसाठी नियोजन सुरु आहे.
रामगोपाल चौधरी, संचालक, चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि.