

नाशिक : त्र्यंबकेश्वर-इगतपुरी तालुक्यातील रखडलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजनांबाबत आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी अपूर्ण कामांवर खुली नाराजी व्यक्त केली. योजना पूर्ण करण्याबाबत वारंवार बैठका होतात परंतु, कार्यवाही होत नसल्याचे आमदार खोसकर यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने त्यांचा तात्काळ कार्यभार काढून घ्यावा, अशी सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना केली.
आमदार खोसकर यांनी सोमवारी (दि. 22) जिल्हा परिषदेतील सभागृहात त्र्यंबकेश्वर-इगतपुरी तालुक्यातील जलजीवन मिशन अतंर्गत पाणी पुरवठा योजनेच्या पूर्ण-अपूर्ण कामांची आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, कार्यकारी अभियंता निवडंगे यांच्यासह अभियंता व ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीत गावनिहाय प्रलंबित कामांचा त्यांनी आढावा घेत, त्याची प्रगती जाणून घेतली. एखाद्या गावात दुख:च्या प्रसंगी गेलो तर महिला लगेच पाण्याची विचारणा करतात. मला घेराव घालतात त्यांना मी काय उत्तरे द्यावी? असा प्रश्न आमदार खोसकर यांनी केला. पावसाळ्यात ही अवस्था आहे तर भविष्यात तीव्र पाणी टंचाई भासेल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वास्तवदर्शी उत्तर द्यावे, असे त्यांनी सांगितले. ठेकेदार, शाखा अभियंता, उपअभियंता हे उडावाउडवीचे उत्तर देत केवळ कागदी घोडे नाचवितात, असे खडेबोलही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सुनावत, त्यांची खरडपट्टी काढली.
वन विभाग, महावितरण, पाटबंधारे विभागाकडे किंवा राज्य स्तरावर प्रस्ताव प्रलंबित असल्यास त्याची तत्काळ माहिती द्यावी. आपण स्वत: त्याचा पाठपुरावा करू, आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. योजनांबाबत वारंवार बैठक घेण्यात येतात. पुढे त्यांचा पाठपुरावा केला जात नसल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त करत, अधिका-यांची चांगलीच कानउघडणी केली.
पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निवडंगे यांची काम करण्याची मानसिकताच नसल्याने त्यांचा कार्यभार काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावा, अशी सूचना आमदार खोसकर यांनी यावेळी केली. योजनांबाबत आठ दिवसांत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी बैठकीत दिला.१० ऑक्टोबरपासून प्रत्येक योजनेला भेट देणार आहे, त्यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थितीत रहावे असेही त्यांनी सांगितले.
पाणी पुरवठा योजनेच्या आढावा बैठकीसाठी संबंधित अभियंत्यासह गावचे सरपंच, ग्रामसेवकांनी बोलविण्यात आले होते. परंतु, बैठकीच्या वेळी ग्रामसेवक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सीईओ पवार यांनी यावेळी यंत्रणेला दिले.