Nashik News | विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा: उध्दव ठाकरे

Nashik News | विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा: उध्दव ठाकरे
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवत संस्मरणीय विजय मिळविल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थाप देत आता विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज व्हा, असे आदेश शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिले. नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचे तोंड भरून कौतुक करत तुमच्या विजयासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते झटले. आता विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही खाद्यांवर घ्या, असा अधिकारवजा सल्लाही ठाकरे यांनी वाजे यांना उद्देशून दिला.

शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख ६२ हजार १ मतांनी पराभव करत वाजे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात 'मशाल' पेटवली. हॅटट्रीकच्या दिशेने उधळलेला गोडसे यांच्या विजयाचा वारू रोखत वाजे 'जायंट किलर' ठरले. या विजयानंतर वाजे यांनी बुधवारी(दि.६) सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, माजी आमदार विनायक पांडे, डी.जी. सूर्यवंशी यांच्यासह 'मातोश्री' वर भेट देत पक्षप्रमुख ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. अर्धा तास झालेल्या चर्चेमध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणुकीसंदर्भात माहिती सादर केली. विजयामागे शिवसेनेसह सर्वच घटकांनी मदत केल्याचे तसेच महाविकास आघाडीचा धर्म, घटक पक्षांनी पाळल्याचे वाजे यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वाजे यांना सल्लावजा सूचना केली. तुम्ही निवडून आले व लोकांनी देखील तुम्हाला निवडून आणले. आता आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आगामी काळात विधानसभेसह महापालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. यावेळी केशव पोरजे, माजी महानगर प्रमुख सचिन मराठे, महेश बडवे हेही उपस्थित होते.

दराडेंना गुळवेंचे काम करण्याचे आदेश

मातोश्रीवरील भेटीप्रसंगी आमदार नरेंद्र दराडे हे देखील उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने शिक्षक मतदार संघासाठी संदीप गुळवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्या अनुषंगाने पक्षाचे काम करण्याचे आवाहन आमदार दराडे यांना करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news