नाशिक : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या मुद्यावरून भाजप आमदारांनी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्यासह अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आयुक्त फिल्डवर उतरतील अशी अपेक्षा होती. मात्र, 'नमामि गोदा' प्रकल्पासंदर्भात प्रधान सचिवांनी पाचारण केल्याचे कारण देत अधिकारी दिल्लीत मार्गस्थ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांसह शहरातील विविध नागरी प्रश्नांसंदर्भात भाजप आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. अॅड. राहुल ढिकले यांनी आयुक्त डॉ. करंजकर यांच्यासह पालिकेतील खातेप्रमुखांची मंगळवारी भेट घेत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आयुक्तांनी फिल्डवर उतरावे, अन्यथा आम्ही तुम्हाला खुर्चीत बसू देणार नाही असा इशाराच आमदारांनी दिला होता. बुधवारपासून आयुक्त शहरांमध्ये स्वतः फिरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना अचानक ते अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे अशा प्रमुख अधिकाऱ्यांसह दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. केंद्र शासनाच्या प्रधान सचिवांनी दिल्लीत बैठक बोलविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अर्थात नमामि गोदा प्रकल्प शहरासाठी आवश्यक असला तरी या प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी प्रशासनाकडून इतकी गोपनियता का बाळगली गेली हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
आयुक्त व प्रमुख अधिकारी हे बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे तीन दिवस दिल्लीमध्ये असणार आहेत. त्यानंतर शनिवार व रविवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे आता प्रमुख अधिकारी सोमवारीच महापालिकेमध्ये येणार आहेत. त्यामुळे आमदारांनी दिलेला पाच दिवसांचा अल्टीमेटम हवेत विरणार आहे. प्रमुख अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शहरातील खड्डे बुजविण्याची मोहिम प्रभावीपणे राबविली जाणार का, हा प्रश्न आहे.
नमामी गोदावरी प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी प्रधान सचिवांनी दिल्लीत बैठक बोलविली आहे. या बैठकीसाठी आयुक्त व प्रमुख अधिकारी दिल्ली दौऱ्यावर आहेत. शहरामधील खड्डे दुरुस्तीसाठी ठेकेदार व कनिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
- संजय अग्रवाल, शहर अभियंता,