Nashik News : खेलो इंडियात मेघा आहेर हिला सुवर्ण

मनमाड : प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक विजेती मेघा आहेर आणि कांस्यपदक विजेता कृष्णा व्यवहारे.
मनमाड : प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक विजेती मेघा आहेर आणि कांस्यपदक विजेता कृष्णा व्यवहारे.

मनमाड : पुढारी वृत्तसेवा

चेन्नई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने वेटलिफ्टिंगमधील आपल्या बहिण-भावाचा पदक जिंकण्याचा वारसा कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारे याने कांस्यपदक पटकाविले.

शेतकऱ्याची पोर लई हुशार हे म्हणणे आज येथे खरे ठरले. मनमाडजवळील मांडवड येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेघा आहेर हिने वेटलिफ्टिंगमधील ४५ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले. तिने क्लीन व जर्कमध्ये स्पर्धा विक्रमाचीही नोंद केली. विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाली आहे.

मेघाने या स्पर्धेतील स्नॅच या प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात ६३ किलो वजन उचलले, तर क्लीन व जर्क या प्रकारात ८५ किलो असे एकूण १४८ किलो वजन उचलले. क्लीन व जर्क या प्रकारात तिने दुसऱ्या प्रयत्नावेळी महाराष्ट्राच्याच सौम्या दळवी हिने गतवेळी नोंदविलेला ८३ किलो या विक्रमाची बरोबरी केली. पाठोपाठ आंध्र प्रदेशच्या आर. भवानी हिने ८४ किलो वजन उचलून नवा उच्चांक नोंदविला. तथापि, मेघाने शेवटच्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलून नवा विक्रम प्रस्थापित केला. मेघाचे वडील संतोष व आई इंदूबाई हे दोघेही आपल्या लेकीचे स्वप्न साकार करतानाचे साक्षीदार होते. मेघा हिने पदक स्वीकारल्यानंतर त्या दोघांना घट्ट मिठी मारली, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

मेघा ही मनमाड येथील छत्रे महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शास्त्र शाखेत शिकत आहे. ती जय भवानी व्यायाम शाळा येथे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. मेघा व तिची भावंडे मनमाड येथे राहून सराव करतात.

तीन पदके जिंकणारे कुटुंब
मेघा हिची मोठी बहीण वीणा व भाऊ मुकुंद हे दोघेही आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर आहेत. या सर्व भावंडांच्या खुराकाची तसेच अभ्यासाची जबाबदारी त्यांची आई स्वतः सांभाळते. भावंडांकडून प्रेरणा घेत मेघाने वेटलिफ्टिंगमध्ये करिअर सुरू केले आहे. आहेर कुटुंबातील हे तिसरे खेलो इंडिया स्पर्धेतील पदक असून, यापूर्वी वीणा व मुकुंद यांनी खेलो इंडियाचे पदक पटकावले होते. एकाच घरात तीन खेलो इंडिया स्पर्धेचे पदक असणारे ते महाराष्ट्रातील ते पहिले कुटुंब बनले आहे.

आकांक्षा पदकापासून वंचित
मेघा हिच्याच गटात आकांक्षा व्यवहारे हीदेखील सहभागी झाली होती. मात्र, तिला पदकापासून वंचित राहावे लागले. एक आठवड्यापूर्वी ती अरुणाचलमध्ये झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. तेथे तिला कांस्यपदक मिळाले होते. तेथून येताना तिची खूपच दमछाक झाली होती. त्यामुळे तिला येथील खेलो इंडिया स्पर्धेत पदक मिळवता आले नाही.‌

कृष्णा व्यवहारेची चमकदार कामगिरी
मुलांच्या गटात मनमाडच्याच कृष्णा व्यवहारे याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने स्नॅच प्रकारात ८३ किलो वजन उचलले, तर क्लीन व जर्कमध्ये त्याने १०१ किलो असे एकूण १८४ किलो वजन उचलले. तो मनमाड येथील गुड शेफर्ड हायस्कूलमध्ये शिकत असून, त्याचे या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. तो जय भवानी व्यायामशाळा येथे त्याचे काका प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, मुख्याध्यापक आर. एन. थोरात, जय भवानी व्यायामशाळेचे मोहन गायकवाड, प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी, क्रीडा प्रशिक्षक मनोज देशपांडे, लकी रिसम, महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news