

पुढारी ऑनलाइन डेस्क | मुंबई कुर्ला येथे झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातानंतर नाशिकमधील सिटीलिंक बसव्यस्थापन सतर्क झाले आहे. सिटीलिंक बस व्यवस्थापनाने कुर्ला बस अपघातातून धडा घेत मोठे पाऊल उचलले आहे. सिटीलिंक व्यवस्थापनाने चालकांना आता प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
9 डिसेंबर रोजी बेस्ट बसला मुंबई कुर्ला येथे अपघात झाला. यात ४९ नागरिक गंभीर स्वरुपात जखमी झाले. तर सात जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. अवघा महाराष्ट्र या घटनेनं हळहळला. याप्रकरणी बस चालक संजय मोरे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. परंतु अपघातानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. हा अपघात नेमका का घडला? त्यात दोषी कोण? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुरु झाला आहे.
दरम्यान, तपासात कुर्ल्यात अपघातग्रस्त बेस्ट बसच्या चालक संजय मोरेला केवळ तीन दिवसांचं इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. याआधी संजय मोरे जूनी बस चालवायचा. त्यामुळे संजय मोरेने अपघात झाला त्यावेळी क्लच समजून चुकून अॅक्सिलरेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढला, अशी धक्कादायक माहिती देखील तपासात उघड झाली आहे.
नाशिक सिटीलिंकमुळेही आतापर्यंत शहर परिसरात अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात झाले असून काही नागरिकांचा बळी देखील गेला आहे. मात्र नाशिकमधील आजवर झालेले अपघात व मुंबई कुर्ला येथे झालेला बेस्ट बस अपघाताचे गांभीर्य ओळखून नाशिक बस व्यपस्थापन सतर्क झाले असून त्यांनी चालंकाना प्रशिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
चालकांना दर रविवारी टप्प्याटप्याने प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मुंबई दुर्घटनेनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 40 च्या बॅचने दर रविवारी चालकांना प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. त्यात सिटी लिंक चालकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका कायम आहे. महामंडळाच्या नाशिक विभागात गेल्या आठ महिन्यात बसगाड्यांचे १२० अपघातांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २२ व्यक्तींचा बळी गेला असून १९६ जण जखमी झाले. त्यामुळे अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी नाशिक विभागाने पावले उचलत चालकांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.