कोल्हापूर : गणराय आगमन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक रूपाली भीमराव पवार यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करणार्या सराईत गुंडाच्या राजारामपुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सूरज तानाजी नलावडे (वय 33, रा. शाहूनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी बजावली.
राजारामपुरी येथील जनता बझार चौकात शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती. पोलिस उपनिरीक्षक पवार यांनी फिर्याद दाखल करताच पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी त्यास अटक केली. सूरज नलावडे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 2019 मध्ये त्याच्याविरुद्ध गर्दी, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.
राजारामपुरी परिसरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गणराय आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या. जनता बझार चौकातून मिरवणुका नेण्यासाठी उपनिरीक्षक पवार यांच्यासह अन्य अधिकार्यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांना सूचना केली. त्यामुळे चिडलेल्या सूरजने पवार यांच्यासह पोलिस सहकार्यांशी हुज्जत घातली. ‘असले पोलिस अधिकारी लई बघितलेत मी. पुढे जात नाही, काय करायचे ते करा,’ असे म्हणत त्याने शिवीगाळ करीत पवार यांच्यासह पोलिसांना धक्काबुक्की केली.
पोलिसांनी नलावडे याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. पवार या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पथकाच्या प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.