Nashik News | मोकाट डुक्करांचा हैदोस; मखमलाबादला शेतीचे तीनतेरा

मखमलाबाद : गावातील सार्वजनिक वाचनालयाच्या नाल्याजवळ वराह घाण करत असून, त्यांच्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. (छाया : नेमिनाथ जाधव)
मखमलाबाद : गावातील सार्वजनिक वाचनालयाच्या नाल्याजवळ वराह घाण करत असून, त्यांच्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. (छाया : नेमिनाथ जाधव)
Published on
Updated on

[author title="मखमलाबाद (नाशिक) : नेमिनाथ जाधव" image="http://"][/author]
मखमलाबाद व परिसरातील मातोरीरोड, शांतिनगर व मळे परिसरात मोकाट वराहांचा वावर वाढत असल्याने शेतीचे तसेच इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी महापालिकेने त्वरित वराहांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रात्री शेतात घुसून वराहांचे कळप फळबागांची तसेच टोमॅटो, भाजीपाला शेतीची नासधूस करत आहेत.

  • डुक्करांच्या उच्छादामुळे गेल्या सहा महिन्यांत शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
  • शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.
  • कुरतडलेला शेतमाल खरेदी करण्यास व्यापारी नकार देत असल्याने लाखो रुपयांचा फटका.

गावात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. मखमलाबाद गावाच्या उत्तरेकडील तसेच पश्चिम बाजूस मातोरी रोड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र आहे. वराहांच्या उच्छादामुळे गेल्या सहा महिन्यांत शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. याबाबत मनपाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. सध्या या परिसरात भेंडी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबीचे पीक बहरले असून, ते काढणीच्या टप्प्यात आहे. परंतु ते पीक वराह खात असल्याने फळांचे कंद खराब होत आहेत. नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत. कुरतडलेला शेतमाल खरेदी करण्यास व्यापारी नकार देत असल्याने लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे.

मखमलाबाद परिसरात दिवसा कोठेही चक्कर मारली, तरी मोकाट वराहांचे पाच ते सहा कळप फिरताना दिसत आहेत. हे कळप जागोजागी विष्ठा आणि मूत्रविर्सजन करत असल्याने परिसरात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. सध्या नाशिकला स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढलेले आहेत. मखमलाबादला मोकाट वराहांच्या कळपांमुळे स्वाइन फ्लूचा फैलाव होण्याचीही भीती आहे.

वाहनचालकांनाही धोका

वराहांच्या कळपातून जर एखाद्या वराहाने पळ काढला, तर त्याच्या मागोमाग बरेचसे वराह रस्त्यावरून पळतात त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनावर धडकण्याची दाट शक्यता असते. परिणामी छोटा-मोठा अपघात होऊ शकतो. नाल्याच्या पुलाखाली तसेच कचरा साचलेल्या ठिकाणी हे वराह घाण करत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी व नागरिक करत आहेत.

शेतीत बी-बियाणे पेरलेले आहे तसेच पिकाचे उत्पादन काढत असताना वराहांचे कळप शेतजमीन पोखरून शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. हातचे आलेले पीक वाया जात असल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. मनपाने त्वरित कार्यवाही करावी. -रमेश जाधव, शेतकरी, मखमलाबाद.

फळबागांचीही नासधूस

रात्री शेतात घुसून वराहाच्या मोकाट टोळ्या फळबागांच्या खोडाजवळची जमीन उकरत आहे. त्यामुळे मुळांना इजा होऊन उंच वाढलेली आंब्याची झाडे सुकत असल्याचा परिणाम पाच-सहा शेतकऱ्यांच्या शेतात ऐन पावसाळ्यात दिसत आहे. झाडाखाली पडलेले आंबे खाऊन झाल्यानंतर जमीन उकरण्याचा उद्योग वराहाचे कळप करत असल्याने परिसरातील शेतकरी कमालीचे वैतागले आहेत

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news