

नाशिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या दरात 14.95 टक्के भाडेवाढ लागू केल्याने नाशिक ते मुंबई साध्या बसच्या प्रवासासाठी 43 रुपये, नाशिक- पुणे 48, तर नाशिक- पुणे शिवशाहीसाठी 68 रुपये दरवाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता. परिणामी एसटीला दर महिन्याला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागत होता. भाडेवाढ लागू झाल्याने हा तोटा भरून काढता येणार आहे. एसटीची मागील दरवाढ तीन वर्षांपूर्वी 26 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. तेव्हापासून अद्यापपावेतो भाडेवाढ झालेली नाही. 25 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ वाढ लागू झाली आहे. डिझेल, चेसीस, टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किमती अन मागील काळात कर्मचार्यांच्या पगारात झालेली वाढ यामुळे एसटी तोट्यात गेली होती. हा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे होता. सुधारित भाडेवाढीनुसार 6 किलोमीटरला 1 रुपया याप्रमाणे दरवाढ लागू झाली आहे.
तिकीट काढण्यासाठी फोन पेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, ग्रामीण भागात ही सुविधा वापरात नसल्याने सुटे पैसे देण्यासाठी प्रवाशांपुढे मोठी समस्या उभी राहणार आहे. यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे.
भाडेवाढ झाली असली, तरी लाडक्या बहिणींना देण्यात आलेली तिकिटातील 50 टक्के सवलतीची योजना लागूच राहणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तोट्यात गेलेली एसटी नफ्यात आल्याचा दावा शासनाकडून करण्यात आला होता.
एसटी दरात वाढ झाल्याने रिक्षा आणि टॅक्सी भाड्यांमध्येही वाढ प्रस्तावित आहे. रिक्षाचे भाडे 23 रुपयांवरून 26, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. ही दरवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त झळ बसणार आहे.