

मुंबई : ST Bus Fare Hike | डिझेल, टायरचे वाढलेले दर आणि कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, यामुळे दररोज महामंडळाला तीन कोटींचा तोटा होत आहे. त्यामुळे एस.टी. भाडेवाढ अपरिहार्यच होती, असे सोमवारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही भाडेवाढ मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
तिकीट दरवाढीबद्दल विरोधी पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ही भाडेवाढ परिवहन सचिवांच्या बैठकीत झाल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याला याबद्दल माहिती नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे राज्य सरकार ही भाडेवाढ मागे घेणार की काय, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सरनाईक यांनी १९८८ च्या एस.टी. संबंधित कायद्यानुसार प्रधान सचिवांना एस.टी. भाडेवाढ करण्याचा अधिकार आहे. ती अपरिहार्यच होती, असे सांगत या भाडेवाढीचे समर्थन केले. १४ जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एस.टी. भाडेवाढीला मान्यता देण्यात आल्यानंतर हा निर्णय प्रधान सचिवांच्या समितीने घेतला. गेली तीन-चार वर्षे एस. टी. ची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. या काळात डिझेल आणि टायरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे महामंडळाला दरमहा ९० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. हा भार सहन करणे शक्य नाही. त्यामुळे भाडेवाढ करणे अपरिहार्य झाले होते, असे सरनाईक यांनी सांगितले.