

नाशिक : गंगापूर रोडवरील पोलिस वसाहतीत असलेल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक १६च्या इमारतीत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे कार्यालय उभारले जाणार आहे.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. ही शाळा विद्यार्थी संख्येअभावी यापूर्वीच बंद करण्यात आली होती. इमारतीचा काही भाग रिक्त असल्याने या ठिकाणी भुसे यांचे कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून ८८ प्राथमिक व १२ माध्यमिक अशा एकूण १०० शाळा चालविल्या जातात. सद्यस्थितीत या शाळांमध्ये ३२ हजार ३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेने तब्बल ५२ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट स्कूल प्रकल्प उभारला आहे. मात्र त्यानंतरही शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात यश आलेले नाही.
महापालिकेच्या शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंद पडत आहेत. पोलिस वसाहतीतील महापालिकेची शाळा क्रमांक १६ देखील अशा प्रकारे विद्यार्थी संख्येअभावी बंद पडली होती. या शाळेच्या दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचे सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय सुरू आहे. पहिल्या मजल्यावर ई-लर्निंग सेंटर आहे. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयासाठी महापालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शाळा क्रमांक १६ मधील रिक्त जागेत हे कार्यालय सुरू होऊ शकते, असे सांगण्यात आल्यानंतर या जागेची पाहणीदेखील करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर ओएसबी व स्वीय सहायक यांच्यासाठी स्वतंत्र केबिन तसेच इतर स्टाफसाठी कार्यालय, अभ्यागत कक्ष उभारले जाणार आहे. यासाठी एक कोटी रुपयांचा खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केला जाणार आहे.