

नाशिक : राज्यात हिंदी सक्तीवरून महायुती सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केलेला असतानाच आता सरकारमधील मित्रपक्ष अन् राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनीही हिंदी सक्तीला विरोध दर्शविला आहे.
हिंदी सिनेमा, सीरियल यामुळे घराघरात हिंदी अगोदरच पोहोचली आहे. हिंदी लादण्याची गरज नाही. पहिलीपासून तीन भाषा टाकल्या तर ते कठीणच होईल, असे मंत्री भुजबळ यांनी सांगत, आमचा हिंदीला विरोध नसल्याचेही स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
येवला दौऱ्यावर असताना मंत्री भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेल्या 30 वर्षांपासून अध्यक्ष आहे. रविवारी मुंबईत हिंदी सभा व्हायची तेव्हा फुकट शिकायला मिळायचे. आम्ही मराठी शाळेत जरी शिकलो तरी आज काल हिंदी सर्वांना येते. लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. येवला तालुक्यातील अंदरसूल शाळेत मुली जापनीज भाषेत बोलत होत्या. मात्र, त्या मराठी शाळेत शिकत आहेत. आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन हिंदी सक्ती विषयी अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. हिंदीच्या प्रश्नापेक्षा इतर प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे हिंदी प्रश्नावर राज ठाकरे यांना भेटले आहेत. तसेच अनेक नेत्यांना देखील जाऊन भेटत असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. मनसे प्रमुख यांच्या हिंदी सक्ती आंदोलनाबाबत बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, ते आंदोलन करताहेत आनंदाची गोष्ट आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. सरकारच्या कानावर हिंदी बाबत टाकलेले आहे. अनेक संस्था, शिक्षण तज्ज्ञ, तसेच अनेक वर्तमानपत्र यामध्ये लेख छापून आले आहेत. अनेक तज्ज्ञांचे मतही तेच आहे. पहिलीपासून हिंदी लादणे योग्य नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.