

नाशिक : पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 'आम्ही सुरक्षित आहोत, पण पर्यटन थांबले आहे, आमचे विमान शनिवारी (दि.26) आहे, तत्पूर्वी आम्हाला लवकरात लवकर नाशिकपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती तिथे फसलेल्या पर्यटकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, नाशिकमधील सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने ट्रॅव्हल्स एजन्सीकडून घेतली आहे.
पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील डोंबिवली, पनवेल आणि पुणे येथील सहा पर्यटकांचा समावेश आहे. नाशिकमधील अनेक पर्यटकसुद्धा काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. सुदैवाने सर्व पर्यटक सुखरुप असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. दहशतवादी हल्ला झाल्याने खबरदारी म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरमधील पर्यटन थांबविण्यात आले आहे. त्यामुळे तेथे अडकून पडलेल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनही मदतीसाठी धावले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांच्या सोयीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले असून मदतीची आवश्यकता असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीनगर येथे थांबलेल्या नाशिकमधील कुटुंबीयांनी तातडीने नाशिकला येण्यासाठी व्यवस्था करावी, अशी विनंती केल्यानंतर पर्यटकांची ही विनंती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणापर्यंत पोहोचविल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिली आहे.
श्रीनगर व अन्य भागात थांबलेल्या दहा पर्यटकांनी नातलगांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संपर्क साधला आहे. यामध्ये सिध्दी मुसळे यांच्यासह त्यांचे बंधु सध्या श्रीनगरमध्ये आहेत. याशिवाय मिलिंद गवई, त्र्यंबक चोपडे आणि ई. श्री. मुकुंडे यांच्या तीन कुटुंबांतील एकूण आठ व्यक्ती श्रीनगरमध्ये अडकल्या आहेत. यात तीन महिला आणि पुरूष तसेच दोन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांचे विमान तिकीट शनिवारचे आहे. नाशिकमध्ये परतण्यासाठी लवकरचे तिकीट मिळावे, अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोणी व्यक्ती काश्मिरमध्ये अडकली असल्यास तसेच आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती तिकडे अडकल्याने मदत हवी असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी 0253 – 2317151 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले