

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लांबणीवर पडल्यानंतर आता संघटनात्मक पद असलेल्या शहराध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्त्याही रखडल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
सिंहस्थ बैठकीच्या निमित्ताने रविवारी (दि.१) नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तसेच भाजपच्या प्रलंबित नियुक्त्यांचा फैसला होईल काय, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
राज्यभरातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा होऊन बराच कालावधी लोटला असला तरी नाशिकसह रायगडच्या पालकमंत्रीपदाचा फैसला होऊ शकलेला नाही. नाशिकमध्ये भाजपचे पाच आमदार असताना भाजपच्या वाट्याला जिल्ह्यात एकही मंत्रिपद मिळू शकलेले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन तर शिवसेनेला एक मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदावर भाजपने दावा केला आहे. मात्र गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा होऊन देखील महायुतीतील सुंदोपसुंदीमुळे या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून संघटनात्मक बदलांना सुरूवात केली असली तरी नाशिकबाबत निर्णय घेतांना हात आखडता घ्यावा लागत आहे. भाजपमध्ये सध्या बुथप्रमुख ते प्रदेशाध्यक्षापर्यंतच्या नव्याने नियुक्त्या केल्या जात असून, पहिल्या टप्प्यात राज्यात १२२१ मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ५८ शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परंतु, यात नाशिक शहर, उत्तर, दक्षिण जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला ब्रेक देण्यात आला आहे. नाशिकबाबत एकमत होत नसल्याने नाशिकच्या नियुक्त्या बाजूला ठेवण्यात आल्या आहेत. पालकमंत्री पदापाठोपाठ आता भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांही रखडल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या पदांच्या नियुक्त्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शहराध्यक्षपदासाठी विद्यमान प्रशांत जाधव सह अनिल भालेराव, नाना शिलेदार, सुनील केदार, निखील पवार, पवन भगुरकर यांच्यासह डझनभर इच्छूक आहेत. इच्छूकांकडून लॉबिंग सुरू आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक तोडगा काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.