

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेच्या नाशिक विरुद्ध क्लब ऑफ महाराष्ट्र यांच्यात रंगतदार सामना झाला. स्पर्धेच्या दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकचा उत्सव रविंद्र आखाडे याने सामन्यात नऊ व श्रेयस उगले याने सहा बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तसेच मुजतबा सय्यद याने ८२ व आयुष शहाणे याने नाबाद ५८ अशा धावा करत फलंदाजीत प्रभावी कामगिरी करून मोठा विजय मिळवून दिला आहे.
पुणे येथे खेळविण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नाशिकने मुजतबा सय्यद ८२ व आयुष शहाणे नाबाद ५८ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर ८ बाद ३१० धावा केल्या. उत्तरादाखल उत्सव आखाडे याने तब्बल पाच बळी व श्रेयस उगले याने तीन बळी घेत पुण्याच्या क्लब ऑफ महाराष्ट्र संघाला पहिल्या डावातच ११८ धावांमध्येच गुंडाळले. फॉलोऑननंतर दुसर्या डावात देखील उत्सव आखाडेने चार व श्रेयस उगलेने तीन बळी घेत क्लब ऑफ महाराष्ट्रला दुसर्या डावात देखील केवळ ९२ धावांतच सर्वबाद करत नाशिकला एक डाव व १०० धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.