

नाशिक :
महाराष्ट्र राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बुधवारी २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या वृत्ताने संपूर्ण राज्य हळहळत असतानाच, नाशिकमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. आपल्या लाडक्या 'दादां'च्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने दिंडोरी तालुक्यातील एका कट्टर समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे रहिवासी असलेले सुदाम बोडके (वय - ६३ वर्षे) हे अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जात होते. बुधवारी (दि.२८ जानेवारी) सकाळी जेव्हा अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त टीव्ही आणि सोशल मीडियावर पसरले, तेव्हा ते बातमी ऐकून प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, बातमी ऐकल्यानंतर सुदाम बोडके यांना मानसिक धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे अस्वस्थता जाणवू लागली. कुटुंबीयांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या धक्क्यामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांच्या उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. अजितदादा हे केवळ त्यांचे नेते नव्हते, तर कार्यकर्ते सुदाम बोडके यांची त्यांच्यावर अतूट श्रद्धा होती. ही बातमी त्यांच्या पचनी पडली नाही, त्यांना धक्का बसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.