Nashik News : गुरव परिवाराला प्रशासकांचा दणका
नाशिक : संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील दानपेट्यांवरून गुरवांमध्ये झालेला वाद चव्हाट्यावर आल्यानंतर, तत्कालीन विश्वस्त आणि धर्मादाय उपायुक्तांनी पारदर्शक कारभार करीत दानपेट्यांचा हिशेब इत्थंभूत ठेवला. मात्र, गेल्या २७ जून रोजी विश्वस्तांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच, गुरवांनी पुन्हा एकदा भाविकांकडून अनधिकृतपणे दान घेण्यास सुरुवात केली आहे. चक्क दानपेटीवर थाळी ठेवून भाविकांना त्यात दान टाकण्यास सांगितले जात आहे. ही बाब प्रशासक विलास पाटील यांच्या निर्दशनास येताच त्यांनी गुरवांना नोटीस बजावत दणका दिला आहे.
२८ जूनपासून संस्थानचा कार्यभार प्रशासकांकडे आहे. यापूर्वी मंदिरातील दानपेटीवरून बराच वादंग झाला आहे. मंदिरात एकूण पाच दानपेट्या असून, चार पेट्या संस्थानची व एक पेटी गुरवांची असल्याचा दावा केला जात आहे. गुरव मंडळी अनधिकृतपणे पेटी ठेवून भाविकांची दिशाभूल करीत असल्याचे तत्कालीन विश्वस्तांनी सांगत हा संपूर्ण प्रकार हाणून पाडला होता. यावरून गुरवांमध्ये वाद होऊन सध्या तो न्यायालयात आहे, तर गुरवांमधील वादामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने कपालेश्वर मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्याचे आदेश यापूर्वीच पारीत केले आहेत.
त्याप्रमाणे मंदिरातील सर्व दानपेट्या सील केलेल्या असून, साधारणपणे दर दोन महिन्यांनी धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील निरीक्षकांच्या उपस्थितीत या पेट्यांमध्ये प्राप्त दानाची मोजणी केली जाते. दरम्यान, गुरवांनी धर्मादाय उपायुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवत चक्क दानपेटीवर थाळी ठेवून भाविकांना दान देण्यास भाग पाडले जात आहे.
ही बाब जेव्हा प्रशासक विलास पाटील यांच्या निर्दशनास आली, तेव्हा त्यांनी गुरव परिवारांना हे कृत्य करण्यास मज्जाव करण्यासाठी थेट नोटीस बजावली. तसेच असे गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची ताकीदही नोटिसीद्वारे दिली आहे. संपूर्ण मंदिर परिसरात भिंतीवर पत्रके लावून भाविकांनी केवळ अधिकृत दानपेटीमध्येच दान टाकावे किंवा क्यूआर कोड व देणगी काउंटरवर दान करून त्याबाबतची रीतसर पावती घ्यावी, असे आवाहन केले आहे. प्रशासकांच्या या कारवाईमुळे गुरवांकडून केल्या जात असलेल्या भाविकांच्या लुटीला आळा बसला असून, कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
गुरवांचे हे कृत्य बेकायदेशीर असून, त्याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुन्हा अशा प्रकारचे कृत्य केल्यास, कायदेशीर कारवाई केली जाईल. भाविकांनीदेखील अधिकृत दानपेटीत किंवा क्यूआर कोडद्वारे देणगी द्यावी. त्याची पावतीही प्राप्त करावी.
विलास पाटील, प्रशासक, संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर, नाशिक.

