

नाशिक : सतीश डोंगरे
अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिल्यामुळे आगामी काळात ईव्ही वाहनांचा बोलबाला असण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील सात वर्षांत देशभरात तब्बल 38 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावत असून, त्यात 20 लाख 26 हजार 471 दुचाकी, 16 लाख 48 हजार 860 तीन चाकी, एक लाख 67 हजार 173 चारचाकी, तर सात हजार 763 ई-बसेसचा समावेश आहे. यात वर्षागणिक वाढ होत असल्याने, सध्या ईव्ही उद्योग सुसाट आहे.
प्रदूषणमुक्तीसाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सद्यस्थितीत देशात इंधनावर धावणाऱ्या वाहनांची संख्या 35 कोटींहून अधिक असून, वाहतुकीतून सर्वाधिक 31.7 टक्के प्रदूषण होत असल्याचे एका सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. अशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणे काळाची गरज असल्यामुळे, ईव्ही वाहनांच्या उत्पदनांना बळ देण्यासाठी केंद्राने अर्थसंकल्पात आवश्यक तरतुदींची घोषणा केली आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून ईव्ही वाहन विक्रीचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 2017 ते 2024 या सात वर्षांत तब्बल 38 लाख 50 हजार 267 ईव्ही वाहनांची विक्री झाली आहे. यात दुचाकींची सर्वाधिक संख्या असून, पाठाेपाठ तीन आणि चारचाकी वाहन संख्या आहे. ई-बसेसचाही वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2017-2018 मध्ये चारही प्रकारांत ईव्ही वाहन विक्रीची संख्या अवघी 95 हजार 198 इतकी होती. 2021-2022 मध्ये ही संख्या चार लाख 45 हजार एक इतकी झाली. 2022-2023 मध्ये मात्र हा आकडा थेट 11 लाख 79 हजार 419 वर पोहोचला, तर 2023-2024 मध्ये ही संख्या 16 लाख 70 हजार 736 इतकी झाली आहे.
2022 नंतर ईव्ही वाहन विक्रीने टाकलेला टॉप गिअर सुसाट असून, दरवर्षी त्यात मोठी वाढ होत आहे. आता अर्थसंकल्पातही ईव्ही उत्पादनाला मोठी सवलत दिल्याने त्याचा परिणाम ईव्ही वाहनांवर होऊन वाहन विक्री आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचे ऑटोमोबाइल क्षेत्रातून बोलले जात आहे.
वर्ष 2024 मध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री विक्रमी 1.95 दशलक्ष युनिट्सवर पोहोचली. ही विक्री 2023 मध्ये झालेल्या 1.53 दशलक्ष युनिट्सच्या तुलनेत 27 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
ईव्ही विक्रीतून कंपन्यादेखील मालामाल झाल्या आहेत. 2022-2023 या वर्षात तब्बल दोन लाख 46 हजार 427 कोटींच्या दुचाकींची विक्री झाली आहे. 35 हजार 121 कोटींच्या तीनचाकी ईव्ही वाहनांची विक्री झाली आहे. 11 हजार 465 कोटींची चारचाकी वाहने विक्री झाली आहेत, तर 68 हजार 793 कोटींच्या ई-बसेसची विक्री झाली आहे. यातून कंपन्यांना मोठा नफा मिळाला आहे.