

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त कालिकादेवी मंदिर आणि भगूर येथील रेणुकादेवी मंदिरांमध्ये यंदाही यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल जाहीर केले आहेत. हे निर्बंध २० ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील.
कालिकादेवी मंदिर परिसरात काही मार्गावर दिवसभर वाहतुकीस प्रवेश बंद राहणार आहे. भगूर येथे दुपारी २ ते रात्री १२ या वेळेत वाहतूक निर्बंध असतील. मुंबई नाका परिसरातील कालिकादेवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गडकरी सिग्नल ते हॉटेल रुची या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. चांडक सर्कल ते हॉटेल संदीप या मार्गावर दुचाकी वगळता अन्य वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे.
मुंबई नाका सर्कल येथून हॉटेल रुची, एसएसके हॉटेल आणि चांडक सर्कलमार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. मुंबई नाका सर्कल, मदिना चौक, सारडा सर्कल, शिंगाडा तलाव आणि गडकरी चौक मार्गाचाही वापर करता येईल. नाशिकरोड आणि इंदिरानगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मायको सर्कल, सिबल फर्निचर, मिलिंदनगर झोपडपट्टी, आर. डी. सर्कल आणि इंदिरानगर बोगदा या मार्गाचा वापर करावा. एबीबी, सीसीएम सिझल, आर. डी. सर्कल आणि इंदिरानगर बोगदा हा पर्यायी मार्गही उपलब्ध असेल.
दुचाकी आणि चारचाकीसाठी पार्किंग
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकींसाठी महामार्ग बसस्थानक प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचे मैदान, जनलक्ष्मी बँकेच्या मागील बाजू, एन. डी. पटेल रोड, गुरुद्वारा रोड, गोल्फ क्लब मैदानालगत एलआयसी कार्यालयासमोरील काही भाग, म्हाडा कार्यालयाजवळील जागा आणि शताब्दी रुग्णालयाखालील वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत.
व्हीआयपी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दुचाकींसाठी हॉटेल संदीप कॉर्नर ते श्रीहरी कुटे मार्ग, तिडके कॉलनी येथे रांगेत वाहनतळाची व्यवस्था असेल. दुहेरी रांगेत वाहने उभी केल्यास ती टोइंग करून हटविण्यात येतील. गोल्फ क्लब परिसरातील वाहनतळांवरही एकाच रांगेत वाहने उभी करणे आवश्यक आहे. चारचाकी आणि हलक्या वाहनांसाठी ईदगाह मैदान व गोल्फ क्लब परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
भगूर-देवळालीसाठी पर्यायी मार्ग
भगूरहून देवळाली कॅम्प या मार्गावर पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. पहिल्या मार्गानुसार जोशी रुग्णालय, स्नेहनगर, पेरुमल मार्ग, टेम्पल हिल रोड, जोझिला मार्ग आणि सेंट्रल स्कूल या मार्गाने वाहतूक सुरू राहील. दुसऱ्या पर्यायी मार्गानुसार भगूर नाका २ येथून डावीकडे वळून मल्हारीबाबानगर, बान्स स्कूल रोड, शिंगवे बहुला, धोंडी रोड, खंडेराव टेकडी, डेअरी फार्म, आनंद रोड आणि संसरी नाका या मार्गाने वाहने ये-जा करतील. देवळाली कॅम्पकडून भगूरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी संसरी नाका येथून उजवीकडे वळून आनंद रोड, डेअरी फार्म, धोंडी रोड, शिंगवे बहुला, बान्स स्कूल आणि भगूर नाका क्र. २ या मार्गाचा वापर करावा.
रेणुकादेवी यात्रेसाठीही निर्बंध
भगूर येथील रेणुकादेवी मंदिर परिसरातही दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान यात्रा भरणार आहे. या काळात रेस्ट कॅम्प रोडवरील केंद्रीय विद्यालय ते जोशी रुग्णालय या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना दुपारी २ ते रात्री १२ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे.
एसटी, सिटीलिंक मार्गात बदल
महामार्ग बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस हॉटेल रुचीसमोरून बाहेर पडून डावीकडे वळतील. त्यानंतर सुयश रुग्णालय, एसएसके हॉटेल, चांडक सर्कल, गडकरी सिग्नल, सारडा सर्कल, मदिना चौक आणि मुंबई नाका सर्कलमार्गे पुढे जातील. नाशिकरोड, छत्रपती संभाजीनगर रोड आणि धुळ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सिटीलिंक आणि एसटी बसेस त्र्यंबक नाका, खडकाळी, सारडा सर्कल, मदिना चौक आणि मुंबई नाका सर्कल या मार्गाने जातील. सीबीएस येथून सप्तशृंगगडाकडे जाणाऱ्या बसेसना या बदलातून वगळण्यात आले आहे.