

नामपूर : बागलाण तालुक्यातील नामपूर येथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा मोसम नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १८) दुपारी दोनच्या सुमारास घडली. अथर्व दीपक पगार (१७, रा. उत्राणे) आणि प्रसाद दादाजी वाघ (१८, रा. नामपूर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
नामपूर-मालेगाव रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयासमोरील गजानन कॉम्प्लेक्समध्ये एलिक्झर लर्निंग क्लासेस आहेत. या क्लासमधील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त गणपतीची प्रतिष्ठापना केली होती.
पाचव्या दिवशी शुक्रवारी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार दुपारी दोनच्या सुमारास विद्यार्थी ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्ती घेऊन मोसम नदीपात्रात विसर्जनासाठी गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला असून, क्लासचे संचालक अशोक पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. मगर पुढील तपास करीत आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रात्री रुग्णालय परिसरात नातेवाइकांची मोठी गर्दी झाली होती.
प्रसंगावधानामुळे एक विद्यार्थी बचावला
अथर्व पगार व प्रसाद वाघ यांच्यासोबत वीरन विशाल अहिरे (१७) हादेखील गणेश विसर्जनासाठी गेला होता. नदीपात्रात पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. मात्र, प्रसंगावधान राखत त्याने तातडीने स्वतःला सावरत पाण्याबाहेर येण्यात यश मिळविले. त्यामुळे सुदैवाने तो बचावला.