

नाशिक : दि नासिक मर्चन्ट को-ऑप. बँकेचे स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर करण्याबाबतच्या हालचालींना अगोदरच सभासदांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 20) होणार्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव मांडल्यास सभासदांकडून तो उधळून लावला जाण्याची शक्यता आहे. सभासदांनी अगोदरच विरोधाचा सूर आवळल्याने, संचालक मंडळ याबाबतचा प्रस्ताव सभेत सादर करणार काय? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
नामको बँकेच्या प्रशासकीय इमारतीत शनिवारी (दि. 20) सकाळी 11 वाजता 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. एक लाख 88 हजारांपेक्षा अधिक सभासद संख्या असलेल्या ‘नामको’चे स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव विद्यमान संचालक मंडळाकडून सभेपुढे सादर केला जाण्याची शक्यता आहे.
बँकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी ‘बँकेच्या खासगीकरणातून व्यापारी व शेतकर्यांना फायदा होईल. रिझर्व्ह बँकेच्या जाचक अटीतून सुटका होईल. सर्वसाधारण सभेत सभासदांना परिस्थिती समजावून सांगणार आहोत. ठराव झाला तरीही रिझर्व्ह बँक सकारात्मक निर्णय घेईल, असे नाही’ असे स्पष्ट केले आहे. तर माजी संचालक तसेच सभासदांनी हा प्रस्ताव सभासदांना त्रासदायक असल्याचे सांगत त्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शनिवारी होणारी सर्वसाधारण सभा गाजण्याची शक्यता आहे.
सहकारी बँकेतून खासगी बँकेत रूपांतर करण्याचा संचालक मंडळाचा घाट आहे. बँकेचे खासगीकरण झाल्यास एखादा धनाढ्य व्यक्तीकडे बँकेचा ताबा जाऊ शकतो. यामुळे नाशिकची ऐतिहासिक नामको बँक नामशेष होऊ शकते. यापूर्वी अनेक मोठ्या सहकारी बँकांनी याबाबतचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे बँक वाचविण्यासाठी सर्वांची एकजूट आवश्यक आहे. सभासद, खातेदारांनी जागरूक राहण्याची गरज आहे.
अॅड. श्रीधर व्यवहारे, सभासद, नामको बँक
बँकेचा सर्वात मोठा वर्ग ग्रामीण भागातील आहे. बँकेचे स्मॉल बँकेत रूपांतर झाल्यास, सभासदांना अधिकाधिक सेवा देता येईल. एनडीसीसी बँक बंद पडल्याने, शेतकरी रस्त्यावर आला आहे. त्यामुळे सीडबी, नाबार्ड, एनएचबी यांच्यातर्फे होणारे फंडिंग स्मॉल बँकेच्या माध्यमातून करू शकू. केंद्र आणि राज्याच्या सर्व सबसिडी देता येतील. ‘नामको’च्या ग्राहकांची तिसरी, चौथी पिढी मार्केटमध्ये असल्याने, त्यांना अद्ययावत सोयी सुविधा देणे काळाची गरज आहे. सहकारमध्ये राहून मर्यादा येत असल्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. नामकोचे स्मॉल फायनान्समध्ये रूपांतर झाल्यास, महाराष्ट्रात स्मॉल फायनान्स म्हणून जन्माला येणारी नामको पहिली बँक ठरेल. यात कोणाचाही स्वार्थ नाही. आम्ही सभासदांपुढे आमची बाजू मांडणार आहोत.
हेमंत धात्रक, चेअरमन, नामको बँक