Namami Goda | नमामि गोदा प्रकल्प : गोदाघाट विकास आराखडा सादर

Namami Goda | नमामि गोदा प्रकल्प : गोदाघाट विकास आराखडा सादर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उत्तर प्रदेशातील 'नमामि गंगे'च्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी हाती घेण्यात येणाऱ्या 'नमामि गोदा' प्रकल्पांतर्गत सल्लागार संस्थेकडून महापालिकेला गोदाघाट विकास आराखडा सोमवारी (दि.२६) सादर करण्यात आला. याअंतर्गत मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढ, गोदावरीच्या उजव्या बाजूला चाळीस वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या मलवाहिकांना समांतर वितरण वाहिन्या टाकण्याबरोबरच सोमेश्वर येथे रोप-वे, तर हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान ते कुसुमाग्रज उद्यानदरम्यान नदीपात्रात बोट सफारीचा प्रकल्प राबविण्याची योजना आहे. (Namami Goda Project)

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 'नमामि गोदा' प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. २७८० कोटींच्या या योजनेला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने तत्त्वतः मान्यता देताना १८०० कोटी रुपये देण्याची यापूर्वीच घोषणा केली आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदीसंवर्धन योजनेअंतर्गत शहरातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढ व आधुनिकीकरण तसेच मलजलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्तावदेखील महापालिकेने शासनाला सादर केला आहे. हे दोन्ही प्रस्ताव एकत्रित करून सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अलमण्डस‌् ग्लोबल सिक्युरिटीज कंपनी या सल्लागार संस्थेने नमामि गोदा प्रकल्पांतर्गत गोदाघाट विकासाचा प्रारूप आराखडा सादर केला आहे. त्यात जवळपास ५७ कोटींच्या बांधकामविषयक कामांचे सादरीकरण करताना शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. (Namami Goda Project)

या आराखड्यात मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी मलनिस्सारण केंद्रासाठी नवीन जागा शोधणे व अन्य तांत्रिक बाबींचा पुरवठा करण्याऐवजी अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढ केल्यास खर्चाबरोबरच वेळेची बचत होणार असल्याचे सुचविण्यात आले. टाकळी व तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रात जुने तंत्रज्ञानानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. याच केंद्रांची क्षमता वाढ करण्याचे बांधकाम विभागाकडून सुचविण्यात आले. (Namami Goda Project)

यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक संजय अग्रवाल, नगर नियोजन विभागाचे संचालक, हर्षल बाविस्कर, यांत्रिकी विभागाचे अध्यक्ष अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, सचिन जाधव, राजेश शिंदे, रवींद्र धारणकर, प्रभारी प्रकाश निकम, नितीन पाटील, बाजीराव माळी, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड उपस्थित होते.

पर्यटनाला मिळणार चालना
नमामि गोदा प्रकल्प अंतर्गत गोदा प्रदूषणमुक्ती बरोबरच पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनेही प्रकल्प राबविले जाणार आहेत. याअतंगर्त नवशा गणपती येथे घाट विकसित करणे, पार्किंग सुविधा तसेच पर्यटकांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोमेश्वर धबधबा ते सोमेश्वर मंदिर या दरम्यान रोप-वे बसविण्याचे प्रस्तावित आहे. येथील घाटाची पुनर्बांधणी करून येथे खेळण्यासाठी जागा विकसित केली जाणार आहे. धबधब्याच्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचे रेलिंग तसेच दगडांमध्येच पर्यटकांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तपोवनात लक्ष्मण झुला येथे नवीन पूल बांधण्याबरोबरच 'लेझर शो'चे देखील नियोजन आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नदी पलीकडे कुसुमाग्रज उद्यान असल्याने येथे पोहोचण्यासाठी पर्यटकांसाठी बोट चालविली जाणार आहे. (Namami Goda Project)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news