

सिडको (नाशिक) : खालचे चुंचाळे परिसरात घरात झालेल्या कौटूंबिक वादातून सोमवारी (दि.19) रात्री पतीने झोपलेल्या पत्नीचा गळा मफलरच्या सह्याने आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः घरात ओढणीच्या सह्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चुंचाळे पोलिस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे.
खालच्या चुंचाळे परिसरातील हनुमान मंदिराजवळील मनपा शाळेच्या मागील भागातील भाड्याच्या घरात चेतन माडकर (३३) व पत्नी स्वाती चेतन माडकर (२७) राहत होते. त्यांना तीन मुले असून, घटनेच्या वेळी घरात मुलगा आणि मुलगीच होती. मधला मुलगा घरामागील आजीच्या घरी असताना सोमवारी (दि.19) मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चेतनने पत्नी स्वाती हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर घरातील छताच्या अँगलला गळफास घेऊन त्यानेही जीवन संपवले. रात्री लहान मुलाला जाग आली ही घटना पाहून त्याने पाठिमागे राहणारे आजीला सांगितले. या नंतर घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, चुंचाळे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस उप निरीक्षक शेवाळे पुढील तपास करीत आहेत.