

सिडको (नाशिक) : अंबड औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एक्स्लो पॉइंट येथे वाहतुकीची प्रचंड वर्दळ असल्याने या चौकात सिग्नल बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कामगार, स्थानिक रहिवासी आणि वाहनांची दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून, अपघातांचा धोका वाढला आहे.
अंबड एमआयडीसी हे नाशिकमधील एक महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र आहे. येथे हजारो लहान-मोठे उद्योग असून, लाखो कामगार दररोज कामासाठी ये-जा करतात. एक्स्लो पॉइंट हा एमआयडीसीमधील प्रमुख चौकांपैकी एक आहे, जिथे अनेक अंतर्गत रस्ते येऊन मिळतात. यामुळे सकाळी आणि सायंकाळी, विशेषतः कार्यालये सुटण्याच्यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होते.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी अनेकदा येथे पोलिस कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुळे वाहनचालक नियम मोडतात आणि बेशिस्तपणे वाहने चालवतात आणि लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडणेही अत्यंत धोकादायक बनले आहे.
स्थानिक उद्योजक, कामगार संघटना आणि नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. एक्स्लो पॉइंटवर तत्काळ वाहतूक सिग्नल बसवल्यास वाहतूक सुरळीत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी उदयोजक, कामगार व सर्वसामान्यांकडून होत आहे.
अंबड औदयोगिक वसाहतीत एक्स्लो पॉइंट येथे मोठया प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे या चौकात सिग्नल उभारल्यास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही.
गोविंद झा, कोषाध्यक्ष, आयमा
एक्स्लो पॉइंट येथे मुंबईकडून येणारे ट्रक कंटेनर हे अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत जातात. याच चौकातून सिडको चुंचाळे, अंबड भागात जाणारे वाहनांची वर्दळ असते. सिग्नल उभारणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिस नियुक्त करण्यात आले आहे.
अविनाश शिंदे, महानगरप्रमुख, वंचित बहुजन आघाडी