नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीजवळील चुंचाळे घरकुल योजना भागात रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्खे भाऊ आणि एक अल्पवयीन असे तिघांना ताब्यात घेत अटक केली. शंकर गाडगीळ (वय ३५) असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून, न्यायालयाने संशयितांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, चुंचाळे घरकुल योजना भागात इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षाचालक गणेश दादाजी कांबळे (२५), महेंद्र दादाजी कांबळे (२७) हे दोघे सख्खे भाऊ व एक अल्पवयीन यांचा शंकर गाडगीळ यांच्याबरोबर वाद झाला. तिघांनी गाडगीळ यांच्या डोक्यात दंडुका मारल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले. गाडगीळ यांना परिसरातील रहिवाशांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिस उपनिरीक्षक गणेश मुगले, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत कांबळे बंधू आणि अल्पवयीन अशा तिघा संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अश्विनी शंकर गाडगीळ (२४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मृत गाडगीळ यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.