

सातपूर ( नाशिक ) : सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात आज पहाटे गोवर्धन-सावरगाव शिवारातील फाशीच्या डोंगराजवळ अरविंद पांडे (वय ३८) नामक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तींकडून चाकूने वार करत खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत अरविंद पांडे हे काल रात्रीपासून बेपत्ता होते. ते सातपूरच्या स्वारबाबानगर परिसरातील रहिवासी असून शिवाजीनगर येथे आत्याच्या घरी गेले होते. परंतु नंतर घरी आले नाही. त्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईकांकडून शोध सुरु असताना हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मृत पांडे हा बिगारी कामगार होता. त्याच्या कुटूंबातील येथे कोणीही सदस्य नसून त्याचा घटस्फोट झालेला आहे. मयत पांडे आणि त्याच्याबरोबर असणारे दोघे-तिघे मित्र मद्यपानासाठी फाशीच्या डोंगरावर रात्री गेले होते. तेथे वाद झाल्याने मित्रांनी त्याचा चाकूने भोसकून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. नाशिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृदूला नाईक यांचे पथक या घटनेचा तपास करत आहेत.