नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी (दि. 18) निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर शुक्रवारी (दि. १९) महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी आदेश जारी करत निवडणूक कामांच्या जबाबदारीचे वाटप केले. महापालिकेतील १८ विभागांतील ३१ अधिकाऱ्यांवर निवडणूक तयारी, मतदार याद्या, मतदान केंद्रे, सुविधा, ईव्हीएम यंत्रांची हाताळणी, निवडणूक निरीक्षकांमध्ये समन्वयासह मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुरुवारी (दि. १८) राज्य निवडणूक आयोगाने व्हीसीद्वारे नाशिक महापालिकेच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. निवडणुकीचे नियोजन, उपलब्ध मनुष्यबळ, मतदान यंत्रांची माहिती घेतली.
निवडणुकांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह मतदान, मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयुक्त मनीषा खत्री यांनी यासंदर्भातील आदेश काढून ३१ अधिकाऱ्यांवर निवडणुकांच्या तयारीसह ईव्हीएम हाताळणी, तपासणी, निवडणुकीसाठी येणाऱ्या खर्चाची तयारी सोपविली आहे. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना मतदानपूर्व, मतदानाच्या दिवशी तसेच मतदानानंतर करावयाच्या कामांची जबाबदारी नियुक्ती आदेशातच वाटून देण्यात आली आहे.
तीनही अतिरिक्त आयुक्तांना समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्याकडे मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राची जबाबदारी सोपवली आहे. उपायुक्त अजित निकत यांच्याकडे मनुष्यबळ उपलब्धतेसह निवडणूक परवानग्यांची, तर ईव्हीएम हाताळणीची जबाबदारी अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांच्याकडे सोपवली आहे. आदर्श आचारसंहिता कक्षाची जबाबदारी उपायुक्त संगीता नांदूरकर, कर्मचारी प्रशिक्षण उपायुक्त नितीन पवार, उमेदवार तपासणी खर्च लेखापरीक्षक बळवंत गायकवाड, निवडणूक अधिकारी समन्वय जबाबदारी नगरनियोजन कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांच्याकडे सोपवली आहे.