

नाशिक : नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी मंगळवारी (दि.११) काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीने शहरात 'कही खुशी कही गम' असे वातावरण निर्माण झाले आहे. स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्यासह अनेक दिग्गजांच्या जागा महिला आरक्षित झाल्याने त्यांना आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी कुटुंबातील महिला सदस्याला निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे. तर काहींवर निवडणूक लढविण्यासाठी एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरीत होण्याची नामुष्की ओढावली आहे. आरक्षणामुळे विस्थापित झालेल्यांमध्ये भाजपच्या आठ माजी नगरसेवकांचा समावेश आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता असून जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर मंगळवारी महाकवी कालिदास कलामंदिरात नाशिक महापालिका हद्दीतील ३१ प्रभागांमधील १२२ जागांसाठी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. उपायुक्त तथा निवडणूक कक्षाचे प्रमुख लक्ष्मीकांत साताळकर यांनी या आरक्षण सोडतीचे संचलन केले. सर्वप्रथम तीन सदस्यीय प्रभाग क्रमांक १५ व १९ पैकी चिठ्ठीद्वारे प्रभाग क्रमांक १९ची दोन महिला जागांकरीता निश्चिती करण्यात आली. त्यानंतर अनुसूचित जातीच्या १८ जागांमधून चिठ्ठीद्वारे अनुसूचित जातीच्या ९ जागा महिला राखीव करण्यात आल्या. पाठोपाठ अनुसूचित जमातीच्या ९ जागांपैकी पाच जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरीता ३२ जागा असल्याने ३१ प्रभागांमधून २४ ब या जागेवर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरीता ३२वी जागा चिठ्ठीद्वारे निश्चित केली गेली. यानंतर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या ३२ जागांपैकी १३ जागा थेट सोडतीद्वारे तर उर्वरित ३ जागा चिठ्ठीद्वारे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. यानंतर सर्वात शेवटी सर्वसाधारण जागांपैकी ३१ जागा या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी थेट सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या.
यांनी ठरविले दिग्गजांचे भवितव्य
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार पारदर्शक ड्रममध्ये चिठठ्या टाकून आरक्षण सोडत काढण्यात आली. सान्वी अहिरे, अनुष्का सोनवणे, अर्पित जाधव व सुरेश चौधरी या शालेय विद्यार्थ्यांनी आरक्षित जागांच्या चिठ्ठ्या काढत दिग्गजांचे भवितव्य ठरविले. आरक्षण सोडतीनंतर या विद्यार्थ्यांना आकर्षक भेट देऊन त्यांचा आयुक्त मनिषा खत्री, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या, विनाविघ्न पार पडली आहे. या प्रक्रियेबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे.
मनिषा खत्री, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका.
आरक्षणातून या विद्यमानांना धक्का
स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते (प्रभाग क्रमांक १ क मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आरक्षण)
भाजपचे माजी नगरसेवक सुरेश खेताडे (प्रभाग २ ब मध्ये अनुसूचित जमाती महिला आरक्षण)
भाजपचे माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप( प्रभाग ३ मधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला)
भाजपचे पुंडलिक खोडे (प्रभाग क्रमांक ६ अ मध्ये अनूसुचित जमाती महिला आरक्षण)
भाजपचे रविंद्र धिवरे (प्रभाग ९ अ मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण)
भाजपच्या प्रियंका घाटे (प्रभाग १२ अ अनुसूचित जाती राखिव)
शोभा साबळे (प्रभाग १४ अ अनुसुचित जाती साठी आरक्षण)
भाजपचे अनिल ताजनपुरे (प्रभाग १६ क मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आरक्षण)
शिवसेनेचे संतोष साळवे (प्रभाग १९ अ मध्ये अनुसूचित महिला आरक्षण)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जगदिश पवार (प्रभाग २२ अ मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण)
भाजपचे राकेश दोंदे (प्रभाग २७ अ मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण)
प्रभाग क्रमांक- १
माजी महापौर रंजना भानसी, अरुण पवार, पुनम धनगर यांचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची जागेवर महिला आरक्षणामुळे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांची अडचण झाली असून कुटूंबातील नवीन चेहरा समोर आणावा लागेल.
प्रभाग क्रमांक- २
स्थायी समितीचे माजी सभापती उध्दव निमसे, शितल माळोदे, पुनम सोनवणे यांचा मार्क मोकळा झाला आहे. ब गटात अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडल्याने मागील निवडणुकीत निवडून आलेले सुरेश खेताडे यांना अन्य प्रभाग शोधावा लागेल किंवा महिला सदस्याला संधी द्यावी लागेल.
प्रभाग क्रमांक- ३
या प्रभागातून मागील निवडणुकीत भाजपच्या प्रियंका माने, ऋची कुंभारकर, मच्छिंद्र सानप निवडून आले होते. तर पंचवटी विभागात शिवसेनेच्या एकमेव पुनम मोगरे निवडून आल्या होत्या. मच्छिंद्र सानप यांची जागा मात्र महिला आरक्षित झाली आहे.हे.
प्रभाग क्रमांक- ४
प्रभाग क्रमांक चार मध्ये सन २०१७ च्या निवडणुकी प्रमाणेचं जैसे-थे आरक्षणाची परिस्थिती राहिली आहे. अनुसूचित जाती व जमाती गटामध्ये महिला आरक्षण यंदाही पडले. त्यामुळे आहे तेचं उमेदवार किंवा कुटूंबातील अन्य सदस्यांना उमेदवारी मिळेल. माजी नगरसेवक हेमंत शेट्टी यांचा प्रभाग सुरक्षित राहीला. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागेसाठी आता कोणता नवीन चेहरा भाजपकडून दिला जाईल याकडे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक- ५
या प्रभागात मागील म्हणजेच सन २०१७ च्या निवडणुकीत पडलेले आरक्षण कायम राहिले आहे. त्यामुळे यंदा पुन्हा तेचं चेहरे मैदानात उतरतील असे दिसते. माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, कमलेश बोडके, नंदीनी बोडके यांच्या जागा आरक्षणाने सुरक्षित केल्या तर विमल पाटील यांच्या निधनामुळे सुन निलम पाटील मैदानात उतरतील.
प्रभाग क्रमांक- ६
या प्रभागात माजी महापौर अशोक मुर्तडक, सुनिता पिंगळे यांचा मार्ग मोकळा झाला तर माजी उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्या जागेला धक्का लागला नसला तरी कुटूंबातून कोणाला संधी मिळले हे पाहणे महत्वाचे ठरते तर अनुसूचित जमातीचे आरक्षण महिला झाल्याने माजी नगरसेवक पुंडलिक खोडे यांच्या जागेवर घरातून उमेदवार येतो की पर्यायी व्यवस्था पक्ष तयार करतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.
प्रभाग क्रमांक- ७
या प्रभागात जैसे-थे आरक्षण राहिले आहे. माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, स्वाती भामरे, योगेश हिरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या ठिकाणी आता महायुती होते की भाजप व शिवसेना समोरासमोर लढतात याकडे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक- ८
गंगापूर रोड, आनंदवली भागातील या प्रभागात शिवसेनेचे नेते व माजी गटनेते विलास शिंदे तसेच नयना गांगुर्डे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतू इतर मागासवर्गाचे आरक्षण पडल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांची अडचण झाली असून घरातून उमेदवार द्यावा लागेल. अनुसूचित जमाती साठी जागा आरक्षित झाल्याने महिला व पुरुष दोघांना संधी मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक- ९
या प्रभागात दिनकर पाटील, वर्षा भालेराव, हेमलता कांडेकर यांचा मार्ग मोकळा झाला. परंतू अनुसूचित जातीचे आरक्षण महिला पडल्याने रविंद्र धिवरे यांना घरातून अन्य महिला उमेदवार द्यावी लागेल. किंवा अन्य पर्याय शोधावा लागेल.
प्रभाग क्रमांक- १०
या प्रभागामध्ये शशिकांत जाधव, पल्लवी पाटील, माधुरी बोलकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच इंदुमती नागरे या चौघांचा मार्ग मोकळा झाला असून परिस्थिती जैसे थे राहिली आहे. परंतू उमेदवारांचे भवितव्य महायुती कि स्वबळ यावर अवलंबून राहिल.
प्रभाग क्रमांक- ११
सलीम शेख सीमा निगळ यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अनुसूचित जमातीचे महिला आरक्षण पडल्यामुळे योगेश शेवरे यांची अडचण झाली असून त्यांना घरातून किंवा पर्यायी उमेदवार द्यावा लागेल अनुसूचित जातीची जागा खुली झाल्यामुळे दीक्षा लोंढे यांचाही मार्ग मोकळा झाला आहे किंवा या ठिकाणी प्रकाश लोंढे किंवा घरामधून अन्य उमेदवार दिला जाऊ शकतो.
प्रभाग क्रमांक- १२
या मतदारसंघांमध्ये सर्वसाधारण व ओबीसी या दोन जागा महिला आरक्षित झाल्यामुळे हेमलता पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र सर्वसाधारण ही एकमेव जागा खुली झाल्याने आता भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे यांच्यासोबत समीर कांबळे यांचा देखील मार्ग मोकळा झाला आहे. सोबत अनुसूचित जातीची जागा खुली झाल्याने आता या ठिकाणी प्रियंका घाटे यांच्यासह अन्य पक्षांना देखील पुरुष उमेदवार देण्याची संधी मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक- १३
आरक्षण सोडतीत या प्रभागात जैसे-थे परिस्थिती राहिली आहे. कॉंग्रेसचे शाहु खैरे, वत्सला खैरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे गजानन शेलार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवंगत माजी नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या जागेवर आता घरातून कोणाला संधी दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक- १४
जुने नाशिकच्या या प्रभागात मुशीर सैय्यद, सुफी जीन व समिना मेमन यांचा मार्गमोकळा झाला आहे. अनुसूचित जातीचे आरक्षण खुले झाल्याने माजी नगरसेविका शोभा साबळे यांच्या सोबतचं संजय साबळे यांना देखील संधी मिळू शकते.
प्रभाग क्रमांक- १५
माजी उपमहापौर प्रथमेश गिते, सुमन भालेराव, अर्चना थोरात या तिघांनाही संधी असून गेल्या वेळेप्रमाणे परिस्थिती आहे. या प्रभागात मागील टर्म मध्ये दोन जागांवर महिला आरक्षण होते. मात्र ते आरक्षण आता प्रभाग क्रमांक १९ मध्ये पडले आहे.
प्रभाग क्रमांक- १६
अनुसूचित जाती व जमाती या दोन्ही जागा खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे राहुल दिवे यांच्या समोर सुषमा पगारे यांना निवडणूक लढावी लागेल. आशा तडवी याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची जागा आरक्षित झाल्याने अनिल ताजनपुरे यांना आता कुटुंबामधील महिला सदस्यांना संधी द्यावी लागेल किंवा पक्ष अन्य पर्याय योजू शकतो.
प्रभाग क्रमांक- १७
आरक्षण जैसे-थे राहिले आहे. अनुसूचित जाती आरक्षण खुले झाल्याने प्रशांत दिवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासोबतच सुमन सातभाई दिनकर आढाव, मंगल आढाव यांनाही संधी आहे.
प्रभाग क्रमांक- १८
अनुसूचित जाती हे आरक्षण खुले झाल्यामुळे शरद मोरे यांचा मार्ग मोकळा झाला असून त्यांच्या सोबतच रंजना बोराडे, मिरा हांडगे, विशाल संगमनेरे यांचाही मार्ग मोकळा झाला आहे.
प्रभाग क्रमांक- १९
या ठिकाणी अनुसूचित जातीचे आरक्षण महिला झाल्यामुळे संतोष साळवे यांचे अडचण झाली असून उर्वरित व साधारण दोन जागांपैकी एक जागा खुली तर एक महिला आरक्षित झाल्यामुळे पंडित आवारे, जयश्री खर्जुल यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रभाग क्रमांक- २०
प्रभाग क्रमांक २० मध्ये सन २०१७ प्रमाणे आरक्षणाची परिस्थिती आहे. भाजपचे संभाजी मोरुस्कर, डॉ. सिमा ताजणे, अंबादास पगारे तसेच संगिता गायकवाड यांच्या जागा सुरक्षित राहिल्या आहेत.
प्रभाग क्रमांक- २१
अनुसूचित जाती महिला आरक्षण कायम राहिल्याने कोमल मेहरोलीया यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासोबत दोन जागा सर्वसाधारण तर एक जागा ओबीसी महिला आरक्षित झाल्याने शिवसेनेच्या ज्योती खोले, सूर्यकांत लवटे व रमेश धोंगडे यांना अडचण येणार नाही.
प्रभाग क्रमांक- २२
या प्रभागात अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण महिला राखिव झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जगदीश पवार यांच्या जागी महिला उमेदवार निवडूक लढवेल तर शिवसेनेचे केशव पोरजे व सुनिता कोठुळे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवंगत सत्यभामा गाडेकर यांच्या जागेवर कुटुंबियांमधून कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक- २३
अनुसूचित जमाती आरक्षण महिलांसाठी राखीव झाल्याने रूपाली निकुळे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित सर्वसाधारण व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग दोन आरक्षण खुले झाल्याने अनुक्रमे सतीश कुलकर्णी व चंद्रकांत खोडे यांना संधी मिळणार आहे. त्यासोबत एक जागा सर्वसाधारण महिला झाल्यामुळे शाईन मिर्झा यांचाही मार्ग मोकळा झाला आहे.
प्रभाग क्रमांक- २४
या प्रभागात आरक्षण जैसे-थे राहिले आहे. त्यामुळे पुर्वाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व आता भाजप मध्ये प्रवेश केलेल्या राजेंद्र महाले, कल्पना चुंबळे व शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रविण तिदमे या तिघांचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवंगत नगरसेविका कल्पना पांडे यांच्या जागेवर आता कुटुंबाला संधी मिळते की अन्य पर्याय योजला जातो याकडे लक्ष आहे.
प्रभाग क्रमांक- २५
या प्रभागातही आरक्षण जैसे-थे राहिले आहे. भाजपचे नेते सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, भाग्यश्री ढोमसे, शाम साबळे या चौघांनाही संधी मिळेल. महायुती विरुध्द शिवसेना अशी लढतं येथे होईल.
प्रभाग क्रमांक- २६
प्रभाग २६ मध्ये आरक्षणाची स्थिती जैसे-थे आहे. दिलीप दातीर, हर्षदा गायकर, अलका अहिरे, भागवत आरोटे यांना समान संधी आहे. परंतू महायुती कि स्वबळ यावर येथील राजकारण अवलंबून राहिले.
प्रभाग क्रमांक- २७
अनुसूचित जाती हे आरक्षण महिला झाल्यामुळे राकेश दोंदे यांची अडचण झाले असून त्यांच्या कुटुंबातून कोणाला संधी मिळते की पक्ष अन्य पर्यायी वस्तू याकडे लक्ष लागले आहे दरम्यान चंद्रकांत खाडे किरण गामने व कावेरी घुगे यांना मात्र समान संधी आहे
प्रभाग क्रमांक- २८
या प्रभागात सन २०१७ प्रमाणेचं परिस्थिती राहिली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी.जी. सुर्यवंशी, शिंदे गटाच्या सुवर्णा मटाले, भाजपचे प्रतिभा पवार व दिपक दातीर यांना समान संधी आहे.
प्रभाग क्रमांक- २९
या प्रभागात जैसे-थे परिस्थिती असून दोन जागा सर्वसाधारण महिला तर एक जागा सर्वसाधारण खुला व एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला अशी झाल्याने भाजपचे मुकेश शहाणे तसेच निलेश ठाकरे रत्नमाला राणे, छाया देवांग यांना समान संधी आहे.
प्रभाग क्रमांक- ३०
अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षण कायम राहिल्याने ॲड. श्याम बडोदे यांचा मार्ग मोकळा झाला असून त्याबरोबरच उर्वरित दोन जागा महिला आरक्षित राहिल्यामुळे सुप्रिया खोडे व दिपाली कुलकर्णी यांचा मार्ग मोकळा झाला. त्यासोबतच सर्वसाधारण जागा खुली झाल्याने सतीश सोनवणे यांचा मार्गही मोकळा झाला आहे.
प्रभाग क्रमांक- ३१
अनुसूचित जाती आरक्षणामुळे भगवान दोंदे यांची अडचण दूर झाली असून उर्वरित दोन जागा महिला आरक्षित झाल्याने पुष्पा आव्हाड व संगिता जाधव यांना संधी आहे. त्याबरोबरच एक जागा सर्वसाधारण झाल्याने सुदाम ढोमसे यांनाही संधी आहे.