नाशिक : नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकिसाठी मंगळवारी (दि. ११) काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीने स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्यासह अनेक दिग्गजांना धक्का बसला. महिला आरक्षण पडल्यामुळे राजकीय भवितव्य राखण्यासाठी कुटुंबातील महिला सदस्याला निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे. तर काहींवर निवडणूक लढविण्यासाठी एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरीत होण्याची नामुष्की ओढावली आहे. आरक्षणामुळे विस्थापित झालेल्यांमध्ये भाजपच्या आठ माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. मंगळवारी महाकवी कालिदास कलामंदिरात नाशिक महापालिका हद्दीतील ३१ प्रभागांमधील १२२ जागांसाठी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. उपायुक्त तथा निवडणूक कक्षाचे प्रमुख लक्ष्मीकांत साताळकर यांनी या आरक्षण सोडतीचे संचलन केले.
या आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक १ क मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आरक्षण पडल्याने स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, प्रभाग २ ब अनुसूचित जमाती महिला आरक्षित झाल्याने माजी नगरसेवक सुरेश खेताडे, प्रभाग ३ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची जागा महिला राखीव झाल्याने भाजपचे मच्छिंद्र सानप, प्रभाग ६ अ अनूसुचित जमाती महिला आरक्षित झाल्याने भाजपचे पुंडलिक खोडे, प्रभाग ९ अ मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्याने रविंद्र धिवरे, प्रभाग १२ अ अनुसूचित जाती राखिव झाल्याने भाजपच्या प्रियंका घाटे, प्रभाग १४ अ अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्याने शोभा साबळे, प्रभाग १६ क नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपचे अनिल ताजनपुरे, प्रभाग १९ अ अनुसूचित जाती महिला झाल्याने शिवसेने संतोष साळवे, प्रभाग २२ अ अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने राष्ट्रवादीचे जगदीश पवार, प्रभाग २७ अ अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने भाजपचे राकेश दोंदे यांना फटका बसला आहे.