नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आग्रह असून, दिल्लाहूनही तसे आदेश असल्याचे स्पष्टीकरण कुंभमेळा तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. जिथे वाद असतील आणि महायुती शक्य नसेल तिथेच मैत्रीपूर्ण लढतील होतील, असे नमूद करत भाजपमध्ये सुरू असलेले प्रवेश हे महायुतीतल्या घटक पक्षांना शह देण्यासाठी नसून महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या जिंकण्यासाठी आहेत, असेही महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सुनीता चारोस्कर यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यासाठी महाजन सोमवारी (दि. ३) नाशिकमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी जिल्ह्यातील राशप, उबाठा आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशाचा महायुतीला फायदा होईल, असा दावा केला. या प्रवेशामुळे महायुती बळकट होणार असून, त्यामुळे महायुतीतील घटक पक्षामध्ये कुठेही वाद किंवा भानगडी नाहीत, असेही स्पष्टीकरण दिले आहे.
या प्रवेशांवर विरोधातील लोक टीका करणारच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला आमची प्राथमिकता आहे. परंतु, जिथे युती झाली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती लढण्याचा विचार करू. यामुळे आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला किंवा शिवसेना शिंदे गटाला कुठे शह देतो, असा अर्थ होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. वंदे मातरम् या राष्ट्रगीताला विरोध करण्याचे कारण नाही. देशाला स्वातंत्र या गीतानेच मिळाले आहे. त्याचा धर्माशी कोणताही संबंध नसून त्याला सक्ती करण्यास हरकत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विरोधकांकडून 'फेक नॅरेटिव्ह'
मतदारयांद्यामध्ये दुबार नावे असतील, बोगस नावे असतील तर त्या दुरुस्त केल्याच पाहिजेत. याद्या तपासल्या पाहिजेत अशी भाजपचीही भूमिका आहे. परंतु, विरोधकांकडून भाजपचे समर्थन असल्याचा आरोप केला जात असून, तो खोटा आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारयाद्या शुद्ध होत्या का, असा सवाल करत विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळेच विरोधक गोंधळ घालत आहेत. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधक केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला.
तर आमच्याकडे तक्रार करा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी साफसफाई मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिस आयुक्तंकडून गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. रिक्षावाल्यांवरही कारवाई केली जात आहे. अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जात आहे. जमिनी हडपण्याचे उद्योग केले जात आहेत. व्याजाचा धंदा करून सावकारी केली जात आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांकडे कोणी त्रास देत असेल तर बिनधास्त तक्रारी करा, पोलिसांनी ऐकले नाही तर आमच्याकडे करा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करा, असे आवाहन महाजन यांनी यावेळी केले.