

नाशिक : जिल्ह्यातील गेल्या महिन्यापासून निवडणुकीसाठी ११ नगरपरिषदेत मोठ्या प्रमाणात धुमाकुळ सुरू होता. हा जल्लोष मंगळवारी (दि.२) रोजी मतदान होताच थांबला. नगरपरिषदांच्या ११ नगराध्यक्षपदांच्या ५४ आणि १ हजार ३ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाला.
रात्री उशीरापर्यंत मतदान सुरू असल्याने मतदानाची आकडेवारी मध्यरात्री निश्चित झाली असून जिल्ह्यात ११ नगरपरिषदांसाठी सरासरी 68.34 टक्के मतदान झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत मतदानात 5.63 टक्यांनी घट झाली. गत निवडणुकीत 74.44 टक्के मतदान झाल्याची नोंद होती. दरम्यान, नांदगाव, ओझर व मनमाड नगरपरिषदेत सर्वात कमी तर, त्र्यंबकेश्वर व चांदवड नगरपरिषदेसाठी सर्वाधिक मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील सटाणा, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर आणि भगूर या नगरपरिषदांत सत्ताधारी आणि विरोधकांत थेट लढत झाली. मंगळवारी सकाळी आठ वाजता या नगरपरिषदांसाठी मतदानाला प्रारंभ झाला. ग्रामीण भागात सकाळी थंडीची लाट होती. मात्र, या थंडीतही मतदारांना उत्साह दिसून येत होता. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह कमी असला तरी दुपारी दोन वाजेनंतर हा उत्साह वाढलेला दिसला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 17.57 टक्के इतके मतदान झाले होते. परंतु, दुपारी मतदारांचे केंद्रावर येण्याचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी हा आकडा थेट 68.80 टक्क्यांवर जाऊन पोहोचला. रात्री उशिराने मतदानात झालेल्या मतदानाची आकडेवारी निश्चित झाली. सध्या ३ लाख ७२ हजार ५४३ मतदारांपैकी २ लाख ५४ हजार ६०८ नागरिकांनी मतदान केले १ लाखाहून अधिक मतदारांनी मतदानाला जाणे टाळल्याने याचा फटका कोणाला बसणार याचे चित्र आता येत्या २१ तारखेच्या निकालात स्पष्ट होणार असल्याने सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.
भगूर त्र्यंबकमध्ये महिला मतदानात पुढे
जिल्ह्याच्या निवडणुकीत १ लाख ३१ हजार ८४९ पुरुषांनी मतदान केले. १ लाख २२ हजार ७४५ महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भगूर येथे महिलांनी पुरुषांच्या तुलनेत जास्त मतदान केले. पुरुष ४४४१ तर महिला ४५४० मतदान झाले. त्र्यंबकेश्वर येथे पुरुष ५२७८ तर महिलांनी ५७१६ एवढ्या महिलांनी आपला हक्क बजावला. मनमाडमध्ये १३ हजाराहून अधिक महिलांनी मतदानाला जाणेच टाळले. सिन्नरमध्ये जवळपास ९ हजार महिलांनी मतदान केले नाही.