

नाशिक : विविध आरक्षणे, डीपी रस्ते, लेआउटमधील महापालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड तसेच खासगी मालकीच्या भूखंडांच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेने खासगी सर्वेक्षक पॅनलची नियुक्ती केली. यात नऊ सर्वेक्षकांचा समावेश असून, सर्वेक्षणाचे शुल्क खासगी विकासकांना अदा करावे लागणार आहे. महापालिकेच्या नगरनियोजन विभागाने भूसर्वेक्षक पॅनल नियुक्तीचे पत्र क्रेडाई, नरेडको, आयआयए सह पाच बांधकाम क्षेत्राशी संबंधित संस्थांना पाठविले आहे. त्यामुळे विकासकांना आता या भूसर्वेक्षकांकडूनही कामे करवून घेता येणार आहेत.
मंजूर विकास आराखड्यानुसार खासगी जमिनींचा जमीनमालक अथवा विकासकामार्फत विकास होऊन नवीन नागरी वस्ती तयार होत असतात. यामध्ये विकासकामे व सुविधा निर्माण करण्यासाठी अस्तित्वातील स्थितीचे तसेच विकास आराखड्यानुसार प्रस्तावित प्रयोजनांचे पूरक व आवश्यक रेखांकन नकाशे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोजमाप व सर्वेक्षणाची कामे हाती घेतली जातात.
यासाठी महापालिकेने सर्वेक्षक पॅनल नियुक्तीकरिता इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार महापालिकेला १४ जणांनी या पॅनलमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली होती. त्यापैकी नियमानुसार तसेच अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या ९ जणांची नियुक्ती अखेर महापालिकेने भूसर्वेक्षक म्हणून केली आहे. त्यामुळे या पॅनलवरील व्यक्तींकडून आता महापालिकेसह खासगी विकासकांना काम करवून घेता येणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील एकाच ठेकेदाराची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
विकास आराखड्यातील आरक्षण क्षेत्राची मोजणी, क्षेत्र निश्चिती, नकाशा प्रमाणीकरण, डिमार्केशन करणे.
अभिन्यास व बांधकाम परवानगी मंजुरीसाठी डीपी रस्त्यात जाणारे क्षेत्र निश्चिती, संरेषा निश्चिती करणे.
लेआउटमधील खुल्या जागेस कुंपण करण्यासाठी सुधारित सर्वेक्षण व डिमार्केशन.
हेमंत निंबाजी आहेर, विनित कचरू अवसरे, देवेंद्र कचरू अवसरे, रवींद्र बारकू खैरनार, नितीन रमेश रणधीर, हेमंत कैलास पवार, राजेंद्र हरिभाऊ जाधव, प्रसाद गोविंद काळे, संदीप हरिभाऊ जाधव यांची भूसर्वेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्रेडाई, नरेडको, आयआयए, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट ॲण्ड इंजिनिअरींग, असोसिएशन ऑफ सुपरवायझर्स, नाशिक या संघटनांना महापालिकेने पत्र लिहून यांच्याकडून भूसर्वेक्षणाची कामे करवून घेण्याचे सूचित केले आहे.