Nashik Municipal Corporation Recruitment : महापालिकेतील अग्निशमन, अभियंता भरतीला मुहूर्त
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अग्निशमनच्या २४६ व तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांच्या १४० रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून, येत्या दोन दिवसांत या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाणार आहे.
महापालिकेच्या 'क' वर्गीय आस्थापना परिशिष्टावरील ७,७२५ मंजूर पदांपैकी सुमारे 3,500 पदे रिक्त आहेत. महापालिकेचा ब वर्गात समावेश झाल्यानंतर सुधारित आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र त्याला अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, कोरोनाकाळात वैद्यकीय, आरोग्य व अग्निशमन विभागातील ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली होती. या नोकरभरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) समवेत करारदेखील करण्यात आला आहे. मात्र, या भरतीसाठी दिलेली आस्थापना खर्च मर्यादा शिथिल करण्याची मुदत संपुष्टात आल्याने ही भरती होऊ शकली नव्हती.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला भेडसावणारा मनुष्यबळाचा प्रश्न शासन दरबारी पोहोचल्यानंतर शासनाने तांत्रिक संवर्गातील १४० पदांच्या भरतीला काही महिन्यांपूर्वी तर अग्निशमन विभागातील २४६ पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार अभियंते व अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी टीसीएसमार्फत प्रक्रिया राबविली जाणार आहे.
बिंदू नामावलीचा प्रस्ताव मंजूर
अग्निशमन तसेच अभियंता संवर्गातील अभियंता संवर्गातील पदाच्या भरतीसाठी बिंदू नामावलीचा प्रस्ताव महापालिकेने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मंजुरीसाठी सादर केला होता. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला असून, या प्रक्रियेला वेग आला आहे.

