

नाशिक : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आदिवासी बहुल आठ जिल्ह्यातील नोकरभरतीसंदर्भातील पेसा कायद्यानुसार सुधारित बिंदुनामावली मंजुरी दिल्यामुळे नाशिक महापालिकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आस्थापना खर्चाची अडचण कायम असल्याने तूर्त स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत, तसेच वाहतूक विभागातील 140 तांत्रिक पदांची भरती केली जाणार आहे.
सद्यस्थितीत महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील 7,092 पदे मंजूर आहेत. दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे यापैकी साडेतीन हजार पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात शैथिल्य आले आहे. 2018 मध्ये 14 हजार पदांचा सुधारित आकृतिबंध महापालिकेने शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला होता. नगरविकास विभागाने त्यावर आक्षेप घेतल्याने हा आकृतिबंध नऊ हजार पदांपर्यंत कमी केला गेला. परंतु, अद्याप या सुधारित आकृतिबंधालादेखील शासनाने मंजुरी दिलेली नाही.
कोरोना काळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील 706 पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली होती. यासाठी टीसीएस कंपनीसोबत करारही केला होता. परंतु या भरतीलाही मुहूर्त लाभला नाही. त्यानंतर आयुक्त खत्री यांनी पालिकेचा पदभार घेतल्यानंतर अपुर्या मनुष्यबळावर मात करण्यासाठी तांत्रिक संवर्गातील नोकरभरतीला परवानगी देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन शासनाने महापालिकेत तांत्रिक संवर्गातील 140 पदांच्या भरतीसाठी 35 टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल केली होती. परंतु, राज्यातील आठ आदिवासी बहुल भागातील नोकरभरतीसाठी आवश्यक बिंदुनामावलीला मंजुरी नसल्यामुळे ही भरतीदेखील रखडली होती. अखेर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 29 जुलै रोजी नाशिकसह राज्यातील आठ आदिवासी बहुल भागासाठी सुधारित बिंदुनामावली मंजूर केल्याने सिंहस्थापूर्वी महापालिकेत उपअभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता या 140 तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बिंदुनामावलीला मंजुरी मिळाल्याने, महापालिकेने कोरोना काळात मंजुरी मिळालेल्या अग्निशमन विभागातील 348 व आरोग्य-वैद्यकीय विभागातील 358, अशा एकूण 706 पदभरतीसाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची तयारी केली आहे. सिंहस्थासाठी आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी ही भरती प्रस्तावित आहे. तसेच मुख्य अग्निशमन अधिकारीपदासाठी प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्त करण्यासाठीही प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आठ आदिवासीबहुल भागासाठी बिंदुनामावली मंजूर केल्याने महापालिकेत उपअभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता या तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाने नाशिकसाठी प्रलंबित बिंदुनामावली मंजूर केली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तत्काळ आवश्यक अशा 140 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका