

नाशिक : महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी कारवाई तीव्र केली असून, ७१ पैकी ५१ बड्या थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा फेरलिलाव येत्या २६ ऑगस्ट रोजी केला जाणार आहे. ही प्रक्रिया महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये पार पडणार आहे. यापूर्वीच्या लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नव्हता.
घरपट्टी थकबाकीचा आकडा ७८३ कोटींवर गेल्यामुळे महापालिकेने थकबाकीदारांविरोधात मोहीम उघडली आहे. पहिल्या टप्प्यात ७१ बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करून दि. २ ते ४ जुलै दरम्यान लिलावप्रक्रिया राबविली होती. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता. ७१ पैकी २० मिळकतधारकांनी थकीत कराचा भरणा केल्यामुळे संबंधितांच्या मालमत्तांवर आलेली जप्ती कारवाई टळली आहे.
आता उर्वरित ५१ थकबाकीदारांना कर विभागाने दुबार जाहीर लिलावाची नोटीस ८ ऑगस्टला बजावली असून, दि. २६ ऑगस्ट रोजी सहाही विभागांत सकाळी १०.३० ते दुपारी ५ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत लिलावप्रक्रिया राबविली जाणार आहे. लिलावास प्रतिसाद न मिळाल्यास नाममात्र बोली बोलून स्थावर मालमत्ता खरेदी वा कब्जा घेण्यात येणार असल्याचे कर विभागाने स्पष्ट केले आहे. संबंधित स्थावर मालमत्तांवरील दान, गहाण, ताबे गहाण वा अन्य कोणताही व्यवहार बेकायदेशीर ठरेल. तसेच वित्तीय वा इतर संस्थांनी व्यवहार केल्यास, त्या मालमत्तेचा कर भरण्याची जबाबदारी संबंधितांवरच राहील, असे कर उपायुक्त अजित निकत यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक पूर्व - ०६
पंचवटी -११
नाशिक पश्चिम -०६
नाशिकरोड -०७
नवीन नाशिक -१५
सातपूर विभाग -०६