Nashik NMC Budget | नगरसेवकांना प्रभाग विकासासाठी ३१४ कोटी स्थायीकडून ३,४६९ कोटींचे अंदाजपत्रक महासभेला सादर

Nashik NMC Budget | नगरसेवकांना प्रभाग विकासासाठी ३१४ कोटी स्थायीकडून ३,४६९ कोटींचे अंदाजपत्रक महासभेला सादर
nashik news
नाशिक : महापौर हिमगौरी आहेर आडके यांना अंदाजपत्रकाची प्रत सादर करताना सभापती मच्छिंद्र सानप. समवेत मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे आदी.pudhari photo
Published on
Updated on
Summary

नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आगामी आर्थिक वर्षासाठी ३,४६९ कोटी रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक महासभेसमोर सादर केले आहे. या बजेटमध्ये शहरातील विकासकामांवर भर देण्यात आला असून, विशेषतः नगरसेवकांच्या प्रभाग विकास निधीसाठी ३१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Nashik NMC Budget

नाशिक : सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी सादर केलेल्या महापालिकेच्या ३,०११.८५ कोटींच्या मूळ अंदाजपत्रकात तब्बल ४५७ कोटींची वाढ सुचवित ३,४६९ कोटींच्या अंदाजपत्रकाची शिफारस स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी सोमवारी (दि. ३०) महासभेला केली. गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीमुळे निर्माण झालेला विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी टाहो फोडणाऱ्या नगरसेवकांवर प्रभाग विकास निधीच्या रूपाने तब्बल ३१४ कोटींची उधळण या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे कोणतीही कर व दरवाढ न करता विकासकामांना गती देण्याचा संकल्प या अंदाजपत्रकाद्वारे सभापती सानप यांनी केला आहे.महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या -अध्यक्षतेखाली व आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची अंदाजपत्रकीय महासभा सोमवारी पार पडली. सभापती सानप यांनी अंदाजपत्रकाची प्रत महापौरांना सादर केल्यानंतर निवेदन मांडताना ३,४६९ कोटींच्या या अंदाजपत्रकात स्थायी समितीने महसुली उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित केल्याचे नमूद केले.

nashik news
Ashok Kharat case | खरात प्रकरणात तृप्ती देसाईंचे नीलम गोन्हेंवर गंभीर आरोप

या अंदाजपत्रकात विशेषतः घरपट्टी वसुली, विकास शुल्क आणि शासनाकडून येणाऱ्या निधीच्या पाठपुराव्यावर भर देण्यात आला आहे. घरपट्टीची सुमारे ५०० कोटींची थकबाकी असून, योग्य नियोजन केल्यास अतिरिक्त १०० ते १२५ कोटींचे उत्पन्न मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करताना नवीन वसाहतींमध्ये कर आकारणी आणि थकीत वसुलीमुळे आणखी १०० कोटींची वाढ अपेक्षित असल्याचा दावा सभापती सानप यांनी केला.

नगररचना विभागामार्फत विकास शुल्कातूनही सुमारे ११४ कोटींचे अतिरीक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तविताना शासनाकडून स्थानिक संस्था कर व मुद्रांक शुल्क अधिभारापोटी येणे असलेले सुमारे २४३.२८ कोटी रुपये जमा बाजूमध्ये दर्शविण्यात आले आहेत.

विशिष्ट प्रभागांसाठी १३३ कोटी

एकीकडे सत्ताधारी गटातील नगरसेवकांना प्रत्येकी अडीच कोटी, तर विरोधी पक्षातील नगरसेवकांना केवळ दीड कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद या अंदाजपत्रकात केली गेल्याने विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महासभेत गोंधळ घातला. विशेष म्हणजे १३३ कोटींचा निधी विशिष्ट प्रभागांसाठी दिला गेल्याने विरोधी पक्षांकडून संताप व्यक्त केला गेला. १३३ कोटींतील सुमारे ६० टक्के निधी केवळ सहा प्रभागांसाठी दिला गेला. स्थायी समिती १६ सदस्यांसाठी १०६ कोटींची तरतूद केली गेली.

nashik news
Rupali Chakankar SIT Inquiry | रूपाली चाकणकर 'एसआयटी' समोर गैरहजर

स्थायी समिती सभा सानप यांच्या प्रभाग क्रमांक ३ साठी २६ कोटी ६६ लाख, भाजप गटनेते श्याम बडोदे यांच्या प्रभाग क्र. ३० करिता १० कोटी ४० लाख, तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या प्रभाग क्रमांक २५ साठी २० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद केली गेल्याने विरोधकांनी अन्यायाची भावना व्यक्त करत समान निधी वाटपाची मागणी केली.

पायाभूत सुविधांवर भर

या अंदाजपत्रकात नगरसेवकांच्या प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पथदीप व्यवस्था यांसारख्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उद्यान विकासासाठीही मोठ्या प्रमाणात तरतूद केल्याचे सभापती सानप यांनी सांगितले. नगरसेवकांनी सुचविलेल्या प्रभागनिहाय विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने नगरसेवकांची चांदी झाली आहे. मागासवर्गीय, महिला व बालकल्याण, क्रीडा आणि दिव्यांग कल्याण विभागांसाठी राखीव निधीची तरतूद करताना महापौर, उपमहापौर, गटनेत्यांच्या सूचनांनुसार विविध कामांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news