

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी अर्थात रुग्णालये, महाविद्यालये, बस आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना निवारागृहांमध्ये हलविण्यासाठी शहरात सहाही विभागात प्रत्येकी एक अशाप्रकारे सहा शेल्टर उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या शेल्टरसाठी जागांची शोधाशोध सुरू झाली असून यासंदर्भातील प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने मिळकत विभागाकडे सादर केल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली आहे.
सार्वजनिक ठिकाणी, जसे की रुग्णालये, महाविद्यालये, बस स्थानके आणि रेल्वे स्थानके येथून भटक्या कुत्र्यांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आठ आठवड्यांची मुदत दिली आहे. या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना नियुक्त केलेल्या निवारागृहांमध्ये हलवण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच, या सार्वजनिक जागांना कुंपण घालून कुत्रे पुन्हा तिथे येणार नाहीत याची खात्री करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचेही निर्देश दिले आहेत.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून गेल्या २००७ पासून शहरातील भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख ३० हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांवर महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणे हा यामागील उद्देश आहे. मात्र कुत्र्यांचा प्रजनन दर अधिक असल्याने अद्यापही भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला यश मिळू शकलेले नाही.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी असलेल्या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना निवारागृहात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने प्रत्येक विभागात एक शेल्टर हाऊसची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागांचा शोध घेण्यात येत आहे. जागांच्या उपलब्धतेसाठी मिळकत विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोनवणे यांनी दिली आहे.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून २००७ पासून भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार भटक्या कुत्र्यांसाठी शहरातील सहाही विभागात प्रत्येकी एक शेल्टर हाऊस उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा उपलब्धीकरीता मिळकत विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
डॉ. प्रमोद सोनवणे, पशुसंवर्धन अधिकारी, नाशिक महापालिका.
प्रत्येकी हजार कुत्र्यांसाठी शेल्टर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य शासनाकडून भटक्या कुत्र्यांच्या शेल्टरकरीता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १०० भटक्या कुत्र्यांसाठी ७० फुट बाय ४० फुट, ५०० भटक्या कुत्र्यांसाठी १५७ फुट बाय ९० फुट तर १००० कुत्र्यांसाठी २२१ फुट बाय १२७ फुटाचे शेल्टर हाऊस उभारावे लागणार आहे. महापालिका सहाही विभागात हजार कुत्र्यांची क्षमता असलेले शेल्टर हाऊस उभारणार आहे.